Chinchwad: स्पर्धेविना मंजुरी दिलेल्या ‘एम्पायर इस्टेट रॅम्प’च्या निविदेला स्थगिती द्यावी – मारुती भापकर

स्थायी समितीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने एम्पायर इस्टेट रॅम्पच्या निविदेत कोणतीही स्पर्धा झालेली नसताना अर्थपूर्ण व्यवहारातून एकाच निविदेला मान्यता दिली आहे. यामध्ये महापालिका कायद्याचे उल्लंघन झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी संगनमत करुन एकाच निविदेला मंजुरी देण्याचा प्रताप केला आहे. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार होणार असून या कामाला त्वरीत स्थगिती द्यावी. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिंचवड येथे एम्पायर इस्टेटलगत उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलाला चिंचवडच्या बाजूने चढण्या-उतरण्यासाठी रॅम्प बांधण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागातर्फे निविदा मागविण्यात आली होती. निविदा सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत केवळ मेसर्स व्ही. एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांचीच निविदा सादर झाली होती. त्यांनी या कामासाठी सुमारे 15 कोटी 80 लाख 55 हजार 546 रुपयांची निविदा सादर केली होती.

त्यांच्या व्यतिरिक्त कुणाचीही निविदा प्राप्त झाली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने निकोप स्पर्धा होण्यासाठी नव्याने निविदा मागविणे अपेक्षित होते. परंतु, प्रशासनाने तसे न करता दर कमी करण्यासाठी मोतेरे यांच्याशीच पत्रव्यवहार केला. स्थायी समिती सदस्यांनी देखील याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली नाही. सत्ताधारी, विरोधी सदस्यांनी एकाच निविदेला मान्यता दिली आहे. त्यामुळे या कामाला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेसची महाआघाडीचे सरकार असताना पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीत मात्र भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.