Chinchwad : शिकवण्यात आनंद मानाल, तरच चांगले शिक्षक व्हाल: शिक्षणतज्ञ डॉ. दत्तात्रेय तापकीर

एमपीसी न्यूज – अध्यापन ही आनंद देण्याची आणि घेण्याची एक उदात्त प्रक्रिया आहे. अध्यापनात आनंद मानाल, तरच चांगले शिक्षक तयार व्हाल, असे प्रतिपादन प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ. दत्तात्रेय तापकीर यांनी येथे केले.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचालित प्रतिभा महाविद्यालयाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन उत्कृष्ट पाठसादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातील चार विद्यापीठांतील शिक्षणशास्त्र पदवीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यात प्रथम क्रमांक ताथवडे येथील राजश्री शाहू शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी रॅन्सी सॉईक हिने प्रथम क्रमांक मिळविला. तिला भव्य चषक रोख रक्कम व प्रमाणपत्र प्राचार्य डॉ. दत्तात्रेय तापकीर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

दुसरा क्रमांक चिंचवड येथील प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची रश्मी शर्मा तर, तिसरा क्रमांक पुणे येथील आदर्श शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील तनया गोखले हिने मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक पुणे येथील एस.एन.डी.टी. शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सखी भडमकर व चिंचवड येथील जैन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी रुद्रानी नाईक हिला मान मिळाला. त्यांना पुस्तक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी व्यासपीठावरती प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, डॉ. सुवर्णा गायकवाड, समन्वयिका प्रा. अस्मिता यादव, परीक्षक पुणे येथील टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सुरेश इसावे उपस्थित होत्या. पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. दत्तात्रेय तापकीर पुढे म्हणाले, पूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविताना पोटतिडकीने शिकवित. आता शिक्षक विज्ञान, इंग्रजी, गणित, इतिहास आदी विषयांच्या आशयाची निगडित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. हा बदल जरी असला तरी विद्यार्थी हे लाभार्थी आहेत, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. आज स्पर्धेत सहभाग घेणारे विद्यार्थी भावीकाळात शिक्षक होणार आहात. तुम्ही ज्या-ज्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविणार आहात, त्यावेळी विद्यार्थ्यांना वर्गात बसावयास वाटले पाहिजे. शिकविताना ताणतणाव न घेता शिकवता आले पाहिजे. शिक्षक शिकविताना अनेकवेळा त्याचे हात बोलतात, देहबोली महत्त्वाची आहे. विविध विषयांचे सादरीकरण वर्गात करताना शिक्षक म्हणून तुम्हाला आनंद व विद्यार्थ्यांना शिकण्यात रस निर्माण करता आला पाहिजे. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अध्ययन होण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहण करणे सोपे जाईल. शिक्षणशास्त्र पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालय आयोजित करते, ही फारच कौतुकास्पद बाब असून सहभाग घेणार्‍या स्पर्धकांना देखील आपण कोठे कमी पडतो, याचे अचूक आकलन अशा स्पर्धांमुळे होण्यास मदतच होते.

प्रास्ताविकात प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम म्हणाल्या की आमच्या संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, येथील विविध शाखांच्या प्राध्यापकांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करावे. ज्या-ज्या आवश्यक उपाययोजना, नवनवीत कल्पना असतील. त्या प्रत्यक्ष कृतीत आणाव्यात, अशा संकल्पामुळेच यंदा सलग तिसर्‍या वर्षी आंतरमहाविद्यालयीन शिक्षणशास्त्र पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट पाठ सादरीकरण स्पर्धाचे आयोजन करणे शक्य होत आहे. उत्कृष्ठ पाठ निरीक्षण करण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध व्हावी, यासाठी शहा नेहमीच आग्रही असतात. स्पर्धेच्या प्रसंगी मोहननगर येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इ.9 वी मधील विद्यार्थी उपस्थित होते.

तसेच येथील शिक्षणशास्त्र पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांसमोर स्पर्धकांनी आपले सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका उषा साकोरे व कुमिनल दरेकर यांनी केले. तर, आभार कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. अस्मिता यादव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.