Chinchwad : पूर्वग्रहदूषित पोलीस अधिकारी कायद्याचा गैरवापर करत आहेत – विवेक कुलकर्णी

एमपीसी न्यूज – पूर्वग्रहदूषित असलेले निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे हे अधिकारी कायद्याचा गैरवापर करत आहेत. निगडी पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकारी आणि 250 जणांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ काढून घ्यावेत, अन्यथा देशभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चिंचवडमधील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस जिल्हा अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर, दुर्गवाहिनी प्रांत संयोजिका अॅड. मृणालीनी पडवळ, विजय देशपांडे, मिलिंद देशपांडे, अॅड. सतीश गोरडे आदी उपस्थित होते.

  • यावेळी शरद इनामदार म्हणाले, “युवतींच्या शारीरिक, मानसिक आणि बैद्धीक विकासासाठी देशभर मे महिन्यात सात दिवसीय दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण घेतले जाते. या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षणार्थी युवतींची शोभायात्रा काढण्यात येते. दुर्गा मातेचे धार्मिक प्रतिक म्हणून खोटी तलवार या शोभायात्रेत युवतींच्या हातात असते. याचाच एक भाग म्हणून निगडी येथे 27 मे ते 3 जून या कालावधीत दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचा प्रमुख भाग असलेली शोभायात्रा २ जून रोजी काढण्यात आली. शोभायात्रेसाठी पोलिसांकडून रीतसर परवानगी काढण्यात आली. शोभायात्रेदरम्यान पोलीस बंदोबस्त देखील होता.

पूर्वग्रहदूषित असलेले पोलीस अधिकारी सतीश पवार आणि राजेंद्र निकाळजे हे दोन्ही अधिकारी शोभायात्रेदरम्यान उपस्थित होते. त्यांनी सुरुवातीपासून शोभायात्रेसाठी सहकार्य केले नाही. त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या अधिका-यांशी हुज्जत व वाद घातला. मुलींच्या हातात असलेली शस्त्रे खोटी आहेत, ती पोलिसांनी तपासण्याची परिषदेकडून विनंती केली. तरीही पोलिसांनी शस्त्रे तपासली नाहीत. ती शस्त्रे खरी असल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांना दिली आणि त्याआधारे खोटा गुन्हा दाखल केला.

  • हा गुन्हा सूडबुद्धीने दाखल केला आहे. या घटनेमुळे विश्व हिंदू परिषदेची संपूर्ण देशात बदनामी होत आहे. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा काढून घ्यावा, अन्यथा पुढील आठवड्यात पोलीस आयुक्त कार्यालयात हजारोंचा मोर्चा नेण्यात येणार आहे. तसेच पुढील होणा-या घटनांना पूर्णतः पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असेही इनामदार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.