Chinchwad : पोलीस उपअधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे मागणी

एमपीसी न्यूज – माजलगाव येथील पोलीस उप अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाकडून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष गौतम आरकडे यांनी याबाबत अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायमूर्ती सी एल थूल यांना पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, “भाग्यश्री नवटके बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे उप जिल्हाधिक्षक म्हणून कार्यरत असताना काही मागासवर्गीय नागरिकांनी अॅट्रॉसिटीची तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी भाग्यश्री नवटके यांची भेट घेण्यास सांगितले. त्यावेळी नवटके यांनी उच्च वर्गातील लोकांशी चर्चा करताना दलित समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यामुळे दलित समाजामध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.”

शासनाच्या पोलीस विभागात एखादा अधिकारी शासकीय सेवेत रुजू होताना त्याला भारतीय संविधानाची शिकवण दिली जाते. भारतीय घटनेनुसार प्रत्येक नागरिकाला संरक्षण व न्याय देण्याची शपथ दिली जाते. मात्र नवटके यांनी याचा अवमान केला आहे. त्यामुळे त्यांची उच्च स्तरीय समितीकडून चौकशी करावी, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, असेही पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.