Chinchwad : अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून दिले श्वानाच्या तीन पिलांना जीवदान (Video)

एमपीसी न्यूज – अग्निशमन विभागाच्या जवानांनी अरुंद खड्ड्यात उतरून जीवाची बाजी लावत श्वानाच्या तीन पिलांना जीवनदान दिले. सहा फुटांच्या अरुंद असलेल्या खड्ड्यात ही पिल्ले अडकली होती. प्राधिकरण अग्निशमन उपविभागाच्या जवानांनी त्यांना जीवनदान दिले.

गुरुवारी (दि. 7) सायंकाळी पावणेसहा वाजता वर्दी मिळाली की, वाल्हेकरवाडी, चिचंवड येथील मोनीबाबा वृद्ध आश्रमाजवळ एका खड्ड्यात श्वानाची पिल्ले अडकली आहेत. त्यानुसार प्राधिकरण उपविभागाचे लिडिंग फायरमन प्रदीप काबंळे, वाहन चालक परशुराम इसवे, सिनिअर फायरमन सारंग मंगळरुकर, फायरमन विकास बोंगाळे, अकुंश बडे, ट्रेनी सब ऑफिसर विजय इंगळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

खड्ड्यात अडकलेली पिल्ले जिवाच्या आकांताने ओरडत होती. सहा फूट खोल खड्डा होता. त्याच्या बाजूला असलेल्या अगदी लहान जागेतून घसरून ही पिल्ले खड्ड्यात पडली होती. माणूस खड्ड्यात जाईल अशी परिस्थिती नव्हती. तरीही आत जाण्याइतकी जागा करून फायरमन अंकुश बडे हे दोरीच्या सहाय्याने खड्ड्यात उतरले. बॅटरीच्या मदतीने पिल्लांचा खड्ड्यात शोध घेऊन तीन पिलांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आले.

खड्ड्याच्या बाहेर पडताच पिलांनी आनंदाने उड्या मारत तसेच दुडूदुडू धावत आनंद व्यक्त केला. जवानांनी जीवघेणी धडपड करत पिलांना जीवनदान दिल्याबद्दल नागरिकांकडून जवानांचे कौतुक केले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.