Chinchwad: आनंदनगर दंगल प्रकरणात पाच जणांना अटक; 48 जणांवर गुन्हा दाखल

Chinchwad: Five arrested in Anandnagar riots case; Charges filed against 48 persons आमच्या अडचणी विचारण्यासाठी इथे कोणीही येत नाही. महापालिकेचे अधिकारी आणि राजकारणी यांनी आम्हाला दिलेले शब्द पाळलेले नाहीत.

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील आनंदनगरमध्ये स्थानिक नागरिकांनी दंगल करत तोडफोड केली. आमच्यासोबत राजकारण करून आम्हाला येथे डांबून ठेवले आहे. आम्हाला बाहेर जावू द्या. कोरोनामुळे कोणी मरत नाही, असे जमावाचे म्हणणे होते. याप्रकरणी 48 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.8) दुपारी दोन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली होती.

लक्ष्मण ठोकळ, संदीप वर्मा (दोघेही रा. पत्राशेड, लिंक रोड, चिंचवड), विकास जाधव, रमेश कांबळे आणि तेजस मलेश गोपरेडी (सर्व रा. आनंदनगर, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

तर देवनूल, विशाल मोरे, करण बोरूले, धन्या खंडागळे, बाळ्या, मुसा, बाब्या, विशाल भोसले, मल्हारी कांबळे, धीरज म्हस्के, महादेव सरोदे, विमल गायकवाड, शीला कांबळे, कलावती सोनटक्‍के, रेश्‍मा कांबळे, रोहन आसोदे, राहूल चलवादी, रोहित गोंदणे व इतर 25 महिला व पुरूष यांच्या विरोधातही दंगलीचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी शेवाळे यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आरोपींनी मोठा जमाव जमविला. बाहेर सगळे व्यवहार सुरू झाले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राच्या नावाखाली मग आम्हालाच येथे का डांबून ठेवले आहे. महापालिकेकडून आम्हला कोणत्याही सुविधा योग्य प्रकारे पुरविण्यात येत नाहीत.

आमच्या अडचणी विचारण्यासाठी इथे कोणीही येत नाही. महापालिकेचे अधिकारी आणि राजकारणी यांनी आम्हाला दिलेले शब्द पाळलेले नाहीत. कोरोनामुळे कोणी मरत नाही. आम्हाला येथून बाहेर जाऊ द्या.

गोळ्या दिल्या की माणसे बरी होताहेत, कोणाला काही होत नाही. आमच्या सोबत राजकारण केले जात आहे. असे म्हणत जमावाने सुरवातीला पोलिसांशी वाद घातला.

त्यानंतर जमावने पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरवात केली. पोलिसांच्या बुथमधील खूर्च्या व इतर साहित्याची तोडफोड केली. पोलिसांच्या शासकीय व खासगी वाहनांचीही तोडफोड केली. सोमवारी दुपारी सुमारे दोन तास हा गोंधळ सुरू होता.

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 353, 332, 341, 143, 147, 148, 149, 269, 271, 427, 188 व सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम 1984 चे कलम 3 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्टचे कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3),135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.