Chinchwad: पाच हजार नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते कार्डचे वाटप

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील 13 हजार नागरिकांची नोंदणी करून, त्यातील सुमारे 5 हजार नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कार्डचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या कार्डचे वाटप करण्यात आले आहे. आता या नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत करून घेता येणार आहेत.

विधवा, अपंग, मागासवर्ग, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगारांसह प्रत्येक वंचिताला सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी संपूर्ण चिंचवड मतदारसंघात जागोजागी केंद्र उघडले आहेत. त्यामार्फत सरकारी योजनांच्या जनजागृतीसह पात्र नागरिकांना शोधून काढून त्यांना लाभ मिळवून दिले जात आहेत. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तब्बल 13 हजार नागरिकांची नोंदणी करून, त्यातील सुमारे 5 हजार नागरिकांना कार्डचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले.

आता या नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत करून घेता येणार आहेत. पैसे नसल्याने उपचार करू न शकणाऱ्या रुग्णांना आयुष्मान भारत योजना वरदान ठरणारी आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपापल्या परिसरातील भाजप नगरसेवक तसेच प्रभाग स्वीकृत सदस्यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, अंबरनाथ कांबळे, सागर आंघोळकर, चंद्रकांत नखाते, बाबा त्रिभुवन, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, नगरसेविका माई ढोरे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, उषा मुंढे, चंदा लोखंडे, अर्चना बारणे, मनिषा पवार, सविता खुळे, भाजप शहर सरचिटणीस अमोल थोरात, प्रभाग स्वीकृत सदस्य संदिप गाडे, गोपाळ माळेकर, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, काळूराम बारणे, तानाजी बारणे, संजय मरकड, राज तापकीर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like