Chinchwad: ईएसआय हॉस्पिटलमधील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जेवणात पुन्हा आढळल्या माशा

ESI Hospital Chinchwad Update : Flies found again in the meals of coronary patients जेवणाचा दर्जा सुधारा; अन्यथा जेवण त्याग करण्याचा रुग्णाचा इशारा

एमपीसी न्यूज – चिंचवड, मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट आहे. जेवणात माशा सापडल्या आहेत. त्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा तत्काळ सुधारण्यात यावा; अन्यथा जेवण त्याग करण्यात येईल, असा इशारा कोरोनाग्रस्त रुग्णांनी दिला आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. कोविड रुग्णांवर महापालिकेसह खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. महापालिका कोविड रुग्णांसाठी लाखो रुपयांचा खर्च करत आहे. परंतु, प्रत्यक्षात रुग्णांना मात्र योग्य ती सेवा मिळत नाही.

चिंचवड, मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयातील 30 हून अधिक बाधित रुग्णांनी रुग्णालय प्रमुखांना निवेदन दिले आहे.

त्यात म्हटले आहे की, आम्हाला देण्यात येणारे जेवण, नाष्टा निकृष्ट दर्जाचा आहे. जेवणातील अन्नपदार्थ खाण्यायोग्य नाहीत. हे अन्नपदार्थ खाल्याने पोटदुखी, ॲसिडिटी, जुलाब यासारखे त्रास होत आहेत.

याबाबत वारंवार संबंधितांकडे लेखी तक्रार केली आहे. परंतु, त्याची दखल घेतली नाही. आम्हाला चांगल्या दर्जाचे जेवण, नाष्टा देण्यात यावा; अन्यथा आम्हाला देण्यात येणाऱ्या जेवण आणि व नाष्ट्याच्या त्याग करावा लागेल, असा इशारा बाधित रुग्णांनी दिला आहे.

याबाबत भांडार विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, तक्रारीची खातरजमा केली जाईल. दोषी आढळल्यास ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.

कोरोना रूग्णाला चांगले जेवण मिळावे याकरीता पिंपरी चिंचवड महापालिका लाखो रूपये खर्च करते. पण, संबंधित ठेकेदाराकडून पुरवण्यात येणाऱ्या निकृष्ट जेवणामुळे महापालिका आयुक्तांचे नाव बदनाम होत आहे. २० दिवसापूर्वी सुद्धा निकृष्ट जेवण पुरवण्यात आल्याबाबत संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. वारंवार प्रशासनाकडून सांगुन सुद्धा निकृष्ट जेवण पुरवण्यात येत असेल तर संबंधित ठेकेदारावर त्वरीत कारवाई करावी. तसेच कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण पुरवण्याची व्यवस्था करावी. राहुल कोल्हटकर- करदाता नागरिक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.