Chinchwad: झेंडू आणि शेवंतीची फुले रस्त्यावर फेकून फूल विक्रेत्यांकडून शहरात अस्वच्छता

एमपीसी न्यूज – फुलविक्रेत्यांनी शिल्लक राहिलेली झेंडू आणि शेवंतीची फुले रस्त्यावरच फेकून दिली. त्यामुळे चिंचवड परिसरात रस्त्यावर अस्वच्छता पसरली. यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

दसरा सणामध्ये झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. दोन दिवसांपूर्वी झेंडूच्या फुलांना 100 रुपये किलोच्या पुढे भाव होता. फुलांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रमुख चौकांमध्ये फुल विक्रेते मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी फुलविक्रेत्यांनी स्वच्छतेचे नियम पायदळी तुडविले.

शिल्लक राहिलेली फुले रस्त्यावरच टाकून देण्यात आली. फुलांची नासाडी रस्त्यावरच दिसून आली. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, विजय मुनोत, समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी तत्काळ चिंचवडगाव येथे जाऊन काही फुलविक्रेत्यांना याबाबत समज दिली.

विजय पाटील म्हणाले, “आपले शहर आपण स्वच्छ ठेवले पाहिजे हे सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे. फुल विक्रेत्यांनी अशा पद्धतीने फुले रस्त्यावर टाकून देणे म्हणजे असभ्यपणाचे प्रदर्शन केल्यासारखे आहे. अशा पद्धतीने प्रमुख चौकांमध्ये फुले अस्ताव्यस्त टाकून निघून गेल्यामुळे महापालिका कर्माचा-यांना दुसऱ्या दिवशी साफसफाई करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अशा विक्रेत्यांवर महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.