Chinchwad : त्याची दुचाकी हरवली आणि ती त्यानेच इंटरनेटच्या साहाय्याने शोधली

एमपीसी न्यूज – चिंचवडमध्ये व्यायाम शाळेत गेलेल्या तरुणाची दुचाकी अदलाबदल झाली. तरुणाने तत्परता दाखवत अदलाबदल झालेली दुचाकी इंटरनेटच्या साहाय्याने अवघ्या अर्धा शोधून काढली. हा प्रकार चिंचवड मधील तानाजीनगर येथील व्यायामशाळेच्या पार्किंगमध्ये घडला.

अक्षय शिरोडकर असे दुचाकीचा शोध घेणा-या तरुणाचे नाव आहे. अक्षय तानाजीनगर, चिंचवड येथील व्यायामशाळेत आले. व्यायाम करून परत आल्यावर त्यांना आपली दुचाकी जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी शोधाशोध करूनही दुचाकी मिळाली नाही. मात्र त्यांच्या दुचाकीच्या बाजूला त्यांच्यासारखीच दुसरी एमएच 20 / बीके 6130 ही दुचाकी उभी असल्याचे दिसून आले. आपल्या दुचाकीची अदलाबदल झाल्याची शंका शिरोडकर यांना आली. तिथे उभ्या असलेल्या दुचाकीची पाहणी केल्यावर त्यावर ‘सुखवानी पॅसिफिक’ या सोसायटीचे पार्किंग स्टीकर दिसले. त्यावर 221 क्रमांक लिहिला होता.

अक्षय यांनी गुगलवर सुखवानी पॅसिफिक ही सोसायटी शोधली. ती थेरगाव येथे असल्याचे समजले. त्यावरून त्यांनी गुगलवरून सोसायटीचा लॅंड लाइन क्रमांक मिळवून सोसायटीत फोन केला. सोसायटीच्या अध्यक्षांचा क्रमांक घेऊन 221 क्रमांकाच्या पार्किंग बाबत माहिती विचारली. अध्यक्षांनी त्या पार्किंग बाबत माहिती दिली. ती पार्किंग रणजित नाईक यांना दिल्याचे समजले. त्यानंतर अध्यक्षांनी नाईक यांना फोन करून शिरोडकर यांनी सांगितलेली हकिगत सांगितली. नाईक यांनी दुचाकीचा क्रमांक पाहिल्यानंतर दुचाकीची अदलाबदल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित ज्याठिकाणी दुचाकी पार्क केली होती त्याठिकाणी येत अक्षय शिरोडकर यांची भेट घेतली. दोघांनीही आपल्या दुचाकी ताब्यात घेतल्या. दुचाकी मिळवून देण्यात नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.