Chinchwad: कचरा विलगीकरण व खत निर्मिती प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – घनकचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन हॉलमध्ये भरविण्यात आलेल्या प्रदर्शनास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कच-याचे विघटन करायचे कसे, कचरा जिरवायचा कसा आणि कुठे असा अनेक प्रश्‍नांची उत्तरे प्रदर्शनातून मिळत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने व युनीट्रॅक सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तीन दिवसीय प्रदर्शनाला शुक्रवार (दि.17) पासून सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनामध्ये घनकच-यावर प्रक्रिया करणा-या 50 नामांकित संस्था सहभागी झाल्या आहेत. कचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी जागरुकता वाढवणे आणि नागरिक, व्यावसायिक, मोठ्या सोसायट्या यांनी कच-यावर प्रक्रिया करणे आणि त्याचा पुनर्वापर कसा करावा याबाबतची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जात आहे.

घरात दररोज तयार होणा-या कच-याचे जैविक खतात कसे रुपांतर करावे आणि स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाची असलेली जबाबदारी आणि कर्तव्य याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जात आहे. आपले घर, आपली सोसायटी आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काय करता येईल. याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण तसेच कच-यावर प्रक्रिया करण्यासंदर्भातील अद्ययावत यंत्र सामुग्रीबाबत माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरवासियांना दिली जात आहे.

प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 19 ऑगस्ट अखेर हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. प्रदर्शन निःशुल्क असून या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.