Chinchwad:  रेशन मिळत नसल्याने अडवला धान्याचा ट्रक ; चौघांना अटक  

एमपीसी न्यूज – रेशनकार्ड बंद असताना त्या कार्डवर धान्य मिळत नसल्याने दोन तरूणांनी रेशनच्या धान्याचा ट्रक आडवित आत्महत्या करण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच पोलीस चौकीत नेल्यानंतर पोलीसांना आरेरावी केली. ही घटना मोहननगर पोलीस चौकीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

तुषार बाबु मंजाळकर (वय 25), तेजस दिगंबर शिंदे (वय 24), जया बाबु मंजाळकर (वय 46), आणि वंदना दिगंबर शिंदे (वय45, सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक धर्मराज किसन तोडकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे यांनी दिली. इंदिरानगर येथे शुक्रवारी सकाळी रेशनच्या दुकानात धान्य खाली करण्यासाठी एक ट्रक आला होता. त्यावेळी आरोपी तुषार आणि तेजस यांनी आम्हाला रेशनचे धान्य मिळत नाही. आम्ही ट्रकमधील धान्य खाली करून देणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी आरोपींना बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली.

पोलिसांनी आरोपींना मोहननगर पोलीस चौकीत आणले. त्यानंतर पोलीस चौकीत आलेल्या आरोपींच्या आईनी पोलिसांना आरेरावीची भाषा केली. ‘तुम्ही आमच्या मुलांना मारून टाकता का’? असे बोलून पोलीस हवालदाराशी हुज्जत घालत तुमची वरिष्ठ अधिकार्‍याकडे तक्रार करू, आम्ही कोण आहोत हे दाखवून देऊ, अशी धमकी दिली. पोलिसांनी चौघांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.