Chinchwad : हिंदू म्हणजेच धर्मनिरपेक्ष ‘ – डॉ. संजय उपाध्ये

एमपीसी  न्यूज – बहुसंख्य हिंदू धर्मनिरपेक्ष आहेत म्हणूनच देश सुरक्षित आहे.  हिंदू म्हणजेच धर्मनिरपेक्ष; कारण धर्मनिरपेक्ष हा हिंदू या शब्दाचा प्रतिशब्द आहे असे मत ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. चिंचवड येथील  काशीधाम मंगल कार्यालय येथे रविवारी (दि.२१) गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि मन करा रे प्रसन्न ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिक प्रवचनमालिकेंतर्गत ४५ वे प्रवचनपुष्प गुंफताना डॉ. संजय उपाध्ये  ‘धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?’ या विषयावर बोलत होते. 
गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, रविकांत कळंबकर, उत्तम दंडिमे, संतोष गोलांडे, राजेंद्र घावटे आदी उपस्थित होते. प्रवचनापूर्वी डॉ. चारुदत्त देशपांडे यांचे सतारवादन आणि सायली सांभारे यांचे गायन झाले. विष्णू कुलकर्णी यांनी तबलासाथ केली.

  • डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, “नुकतीच नऊशे कलावंतांनी एकत्र येऊन देशात धर्मनिरपेक्षता खालावल्याची तक्रार केली. तसेच काही बुद्धिवादी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी देशात होत असल्याची ओरड करत असतात; परंतु प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपले अस्तित्व टिकविण्यासाठी या तथाकथित बुद्धिवादी आणि काही कलावंतांची ही केविलवाणी धडपड आहे. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हा सारा खटाटोप आहे. खरे म्हणजे हिंदू हा धर्म नसून ती संस्कृती आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. देशात वैचारिक गोंधळ माजवण्याचे काम ही मंडळी करतात. ते या गोष्टी अज्ञानापोटी करतात.  खरे म्हणजे जगातील इतर कोणत्याही संस्कृतीत नाही एवढे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिंदू संस्कृतीत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पलीकडे जात भक्तिस्वातंत्र्यदेखील हिंदू संस्कृतीने बहाल केले आहे. कोणतीही धार्मिक बंधने नसलेली ही हिंदू संस्कृती आहे” विविध संदर्भ, दाखले, किस्से, विनोद सांगत डॉ. संजय उपाध्ये यांनी निरूपण केले.
कार्यक्रमाच्या संयोजनात गोपी बाफना, धीरज गुप्ते, दशरथ इंगळे, राहुल वाघोले, नवनाथ सरडे, ज्ञानोबा जाधव, विपुल नेवाळे, कलाप्पा जमखंडी, संजय कलाटे, महेश गावडे यांनी परिश्रम घेतले. सुहास पोफळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.