Chinchwad : इतिहास घडविणारी माणसे व इतिहास कधीच विसरला जात नाही – अजित काळोखे

एमपीसी न्यूज- छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती-धर्मांचा समान आदर करणारे, स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरविणारे वास्तववादी राजे होते. असा इतिहास घडविणारी माणसे, इतिहास कधीच विसरला जात नाही असे प्रतिपादन व्याख्याते अजित काळोखे यांनी केले. चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून शिवजयंती संस्थेच्या विशेष सहकार्याने साजरी केली. त्यावेळी ते बोलत होते. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून उपस्थितांनी अभिवादन केले.

यावेळी महाविद्यालयाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. जयश्री मुळे, प्रा. मिनल भंडारी, प्रा. प्रल्हाद गोगरकर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित काळोखे म्हणाले, ” महाराष्ट्र परकीयांची गुलामगिरी भोगत असताना भूमीच्या स्वातंत्र्यासाठी शिवाजी महाराजांनी जुमली राजवटीविरुद्ध लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राष्ट्रप्रेमी व राष्ट्रद्रोही या दोन जाती होत्या. ते धार्मिक होते, पण धर्म भोळे नव्हते. सर्व जाती-धर्मांचा समान आदर करीत होते. त्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविणारे वास्तववादी राजे होते”

आज देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे पूर्ण झाली. तरीसुद्धा महापुरुषांना जाती-पातीत वाटून घेतले जात आहे. काही आंधळ्या भक्तांनी तरुणाईला जातीत बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणांनी एकत्र येत या जाती-पातीच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे. आपणच आपल्या देशाचे तुकडे करीत आहोत, अशी खंत अजित काळोखे यांनी व्यक्त केली. आज तीन वेळा शिवजयंती साजरी होते, याबाबत तरुणांनी वाचन करून बोध घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. दीपक शहा म्हणाले, “प्रत्येक तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले पाहिजे. त्यांनी केलेली कृती व वृत्ती प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे. त्यांनी कधीही जाती-पातीचे राज्य आपल्या कारकीर्दीमध्ये केलेले नाही. राजेंना मॅनेजमेंट गुरु असे संबोधले. आजच्या युवापिढीत प्रचंड ताकद, उत्साह, क्षमता व भक्ती आहे. फक्त योग्य वापर व उपयोग झाला पाहिजे”

महाविद्यालयातील मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा नृत्य नाटिकेद्वारे सादर केला. तसेच कार्यक्रमानंतर मिरवणूक काढण्यात आली. त्यात सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. प्रस्तावना प्रा. प्रल्हाद गोगरकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विद्यार्थी अशोक बन्सल यांनी तर, सूत्रसंचालन ऋतूजा गोखले, ईशा राखी यांनी केले, आभार डॉ. जयश्री मुळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.