Chinchwad : घरात घुसून सराईत गुन्हेगाराचा राडा; मुलीला गायब करण्याची महिलेला धमकी

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून एका घरात घुसून तीन जणांनी मिळून घरातील वस्तूंची तोडफोड केली. तसेच पतीला मारण्याची व मुलीला गायब करण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सायंकाळी साडेसातच्या सुमारास आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.

सुरेखा भास्कर गायकवाड (वय 48, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सस्या ऊर्फ राजू वाघमारे, तोपान सिध्वराम माडेकर व अक्षय (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू वाघमारे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून गुरुवारी फिर्यादी सुरेखा यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. जुन्या भांडणाच्या रागातून ‘तुझ्या पतीला मारून टाकीन, तुझे घर उद्ध्वस्त करून टाकीन’, अशी सुरेखा यांना धमकी दिली. तर मुलगी सुप्रिया हिला देखील ‘तुला कशी गायब करतो’ म्हणत गायब करण्याची धमकी दिली. त्यानंतर, आरोपींनी लाकडी दांडक्याने घरातील टीपॉय फोडून शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.