Chinchwad : हितेश मुलचंदानीच्या मारेक-यांना तात्काळ पकडावे; सिंधी बांधवांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये झालेल्या वादावरून सुरु झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या हितेश मुलचंदानी या युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि. 22) पहाटे पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर घडली. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ पकडून त्यांना कठोर शासन करावे, याबाबत पिंपरीमधील सिंधी बांधवांच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.

हितेश मुलचंदानी याच्या हत्येचा निषेध व्यक्त करत पिंपरीमधील सर्व व्यापारी बांधवांनी बुधवारी (दि. 24) पिंपरी मार्केट परिसरातील दुकाने बंद ठेवली. ‘वुई वॉन्ट जस्टीस’ ‘गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ असे फलक घेऊन व्यापा-यांनी निदर्शने केली.

  • दरम्यान, शगुन चौक, साई चौक आणि पिंपरी मार्केट परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.

सिंधी बांधवांच्या वतीने देण्यात येणा-या निवेदनात म्हटले आहे की, पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी. त्यांना कठोरात कठोर शासन करावे. हितेशला मारणारे आरोपी पोलीस रेकॉर्डवरील आहेत. त्यांनी हितेशची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेनंतर सर्व सिंधी बांधव भीतीच्या वातावरणात आहेत, त्यामुळे पिंपरी परिसरात पोलीस गस्त वाढवावी. तसेच रात्री अकरापूर्वी सर्व दुकाने, हॉटेल, आईसक्रीम पार्लर, पथारीवाले यांची दुकाने बंद व्हायला हवीत.’

  • घटनेची पार्श्वभूमी अशी की, हितेशच्या मित्रांचे पिंपरी येथील कुणाल हॉटेलमध्ये वाद झाले. किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले. हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेश याला त्याच्या मित्राचा फोन आला. हितेशने त्याच्या काही मित्रांसोबत कुणाल हॉटेल गाठले. हॉटेलमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवत असताना चार इसमांनी हितेशला जबरदस्तीने मोटारीत बसवले. चौघांनी हितेशला पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले. तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच त्याचा गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हितेशचा मृत्यू झाला.

आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पिंपरी मार्केट येथे निदर्शने करणा-या नागरिकांना भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले, “हॉटेल चालक, मालक, पोलीस या घटनेला जबाबदार आहेत. उत्पादन विभागाच्या अधिका-यांना हॉटेल उशिरापर्यंत सुरु असल्याबाबत कल्पना आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी सर्वांना मिळून बसवायची आहे. जे हॉटेल या परिसरातील सुरु आहेत. त्यांना देखील आज बंद पाळण्याबाबत सांगितले पाहिजे. आरोपींना तात्काळ अटक करून जास्तीतजास्त शिक्षा व्हायला हवी. पिंपरीच्या गुंडगिरीबाबत वेळोवेळी विधानसभेत आवाज उठवला पण आजवर त्यात सुधारणा झाली नाही.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.