Chinchwad : सांगवीतील तरुणाच्या खून प्रकरणावर गृहमंत्र्यांचे लक्ष; दोषींवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश

Home Minister's attention on Sangvi youth murder case; Instruct the police to take strict action against the culprits

एमपीसी न्यूज – सांगवी येथे रविवारी (दि. 7) झालेले मारहाण आणि खून प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. यामध्ये आता थेट गृहमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. दोषी आढळणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. तसेच राज्यात कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. शासन अनुसूचित जातीच्या बांधवांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन देखील गृहमंत्री देशमुख यांनी दिले आहे.

सांगवी, पिंपळे सौदागर येथे रविवारी रात्री मारहाणीची घटना घडली. मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा प्रकार प्रेमप्रकरणातून झाला आहे.

दरम्यान, मारहाण करताना आरोपींनी मयत तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केली होती. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात खुनासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलिसांनी यातील आरोपींना अटक केली आहे. हे प्रकरण आता राज्यभर पसरले आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे.

याबाबत गृहमंत्री  देशमुख    म्हणाले की, राज्यात अनुसूचित जातीच्या बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार  अजिबात सहन केले जाणार नाहीत.

महाराष्ट्र शासन या बांधवांच्या पाठीशी असून अशा प्रकारच्या गुन्ह्यातील दोषींविरुद्ध तात्काळ व कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज,  महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारे महाराष्ट्र राज्य आहे. या राज्यात गोरगरीब, अनुसूचित जाती व नवबौद्ध बांधवांवर अन्याय अत्याचार होता कामा नये.

राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे गृहमंत्री म्हणाले.

नरखेड तालुक्यातील पिंपळधरा येथे झालेल्या घटनेबाबत बोलताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, “पिंपळधरा येथे झालेल्या अरविंद बनसोड या तरूणाच्या मृत्यूची चौकशी देखील पारदर्शी व निःपक्षपातीपणे करण्यात येईल.

त्यासंबंधातील निर्देशही पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हा तपास उपविभागीय पोलिस अधिका-याकडे दिला आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.