Chinchwad : रेग्युलेटर खराब झाल्याने घराला आग; दोन महिला जखमी

एमपीसी न्यूज – रेग्युलेटर खराब झाल्याने गॅस गळती होऊन घराला आग लागली. ही घटना आज (रविवारी) सकाळी अकराच्या सुमारास चिंचवडमधील इंदिरानगर झोपडपट्टी येथे घडली. या आगीत घरात काम करणा-या दोन महिला जखमी झाल्या आहेत.

लक्ष्मी विलास धोतरे (वय 35) आणि संगिता गणेश पवार (वय 27) अशी जखमी महिलांची नावे आहेत.

  • याबाबत अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमधील इंदिरानगर झोपडपट्टी येथे घराला आग लागल्याची माहिती हिरामण साळुंखे यांनी अग्निशमन विभागाला दिली. मिळालेल्या माहितीवरून प्राधिकरण येथील एक आणि पिंपरीमधील दोन असे एकूण तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.

इंदिरानगर झोपडपट्टी येथे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आज (रविवारी) त्या घरी तिस-या दिवसाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर आणला होता. या सिलेंडरला बेकायदेशीर रेग्युलेटर वापरण्यात आला. यामुळे रेग्युलेटरमधून गॅस गळती झाल्याने आग लागली. काही क्षणात आग पसरली. मात्र, तात्काळ मदतीमुळे आग नियंत्रणात आली. यामध्ये घरात काम करणा-या दोन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • झोपडपट्टीमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक पोलवरून लोमकळणा-या वायरमुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना जाण्यासाठी अनेक अडथळे आले. त्यातूनही जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. शहरात अनेक अरुंद रस्ते असल्यामुळे वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळे येतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.