Chinchwad : पोलिसांना पाच दिवसांचा आठवडा नसेल द्यायचा तर ड्युटी तरी आठ तास करा; डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपकडून पोलिसांना निवेदन

एमपीसी न्यूज – सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पाच दिवसांचा आठवडा सुरु करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत शासन आहे. पोलीस देखील एक शासकीय विभाग आहे. सर्व विभागांमध्ये पाच दिवसांचा आठवडा केला तर पोलीस विभागात किमान ड्युटी आठ तासांची करावी, अशी मागणी डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पोलीसांना आठ तासांची ड्युटी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पोलीस कार्यतत्पर झाले आहेत. त्यांच्या वैयक्तीक आयुष्यातही सकारत्मक बदल दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंवड शहरात देखील हा उपक्रम सुरु करावा. त्यासाठी पोलीस आयुक्तांनी पुढाकार घ्यावा. सरकारी कर्मचार्‍यांना पाच दिवसाचा आठवडा करण्याचा विचार शासन करीत आहे. पोलीस देखील सरकारी कर्मचारी आहेत. त्यांना पाच दिवसांचा आठवडा नसेल द्यायचा तर ड्युटी तरी आठ तासांची करा.

सरकारी कर्मचार्‍यांना आठ तासांची ड्युटी असते. त्यामध्ये 45 मिनिटे वाढविण्यात येणार आहे. त्याबदल्यात त्यांना दोन साप्ताहिक सुट्ट्या देण्यात येणार आहेत. त्याच सरकारी कामांमध्ये पोलीस देखील येतात. त्यांना मात्र 12 तासांची ड्युटी आहे. त्यांना इतर सरकारी कर्मचार्‍यांपेक्षा जास्त ड्युटी आहे. सरकारी कर्मचा-यांच्या कामाचा ताण कमी करण्याची खरी सुरूवात पोलीस विभागाकडून करण्यात यावी.

इतर कर्मचार्‍यांना विविध संघटना असतात. त्या संघटना शासनाकडे वेळोवेळी मागण्या करीत असतात. मात्र, पोलीसांना अशा प्रकारची संघटना स्थापन करता येत नाही. त्यामुळे पोलीस बांधवांवरील होणार्‍या अन्यायाकडे कोणाचे लक्ष जात नाही. पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी एखादा सण, निवडणूक, मोठा कार्यक्रम किंवा तणावाचे वातावरण तसेच व्हीव्हीआयपी बंदोबस्तासाठी पोलीसांच्या सुट्ट्याही रद्द केल्या जातात.

पोलिसांच्या कामाचे तास कमी केल्यास त्यांच्यावरील देखील ताण कमी होईल आणि सर्व शासकीय कर्मचा-यांप्रमाणे पोलिसांनाही न्याय मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.