Chinchwad : आयआयटी कानपूरचे टॉपर विनयकुमार चौबे टाटा मोटर्स मधील महिला अभियंत्यांकडून प्रेरित होतात तेंव्हा…

एमपीसी न्यूज – आयआयटी कानपूरचे टॉपर असलेले पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Chinchwad)यांनी टाटा मोटर्स मधील महिला अभियंत्यांशी संवाद साधला. त्यांनी शनिवारी (दि. 20) चिंचवड येथील ट्रिम चेसिस फिटमेंट (टीसीएफ) 2 (ओमेगा फॅक्टरी) या युनिटला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी टाटा मोटर्स कडून तयार केल्या जाणाऱ्या हॅरियर आणि सफारी या दोन वाहनांच्या निर्मितीची प्रक्रिया महिला अभियंत्यांकडून जाणून घेतली.
यावेळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह प्लांट हेड श्याम सिंग, एचआर हेड विवेक बिंद्रा, (Chinchwad)ओमेगा फॅक्टरी शॉप हेड स्नेहा शुक्ला आदी उपस्थित होते.
तंत्रज्ञान मानवी जीवनाला सुलभ बनवते, असे आयुक्त चौबे यांचे मत असते. त्यामुळे तंत्रज्ञानाशी निगडित प्रत्येक गोष्टीकडे त्यांचे बारीक लक्ष असते. पिंपरी चिंचवड ही उद्योग नगरी आहे. शहरात हजारो व्यवसाय आहेत. प्रत्येक व्यवसायात तंत्रज्ञानात वापरले जाते. त्यातच टाटा मोटर्स या कंपनीत दोन वाहनांची निर्मिती केवळ महिला करतात, ही माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी या प्लांटला भेट देऊन संपूर्ण प्रक्रिया महिला अभियंत्यांकडून जाणून घेतली.
टाटा हॅरियर आणि सफारीच्या पेटंट बॉडीवर म्हणजेच चेसिसवर फिट होणारी प्रत्येक गोष्ट महिला असेंबल करतात. टाटा मोटर्समध्ये हॅरियर आणि सफारी या दोन्ही वाहनांच्या असेंबली लाईनवर पूर्णपणे महिला काम करतील, असा निर्णय सन 2021 च्या शेवटी घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी फेब्रुवारी 2022 पासून झाली. महिन्याला हजारो वाहने या प्लांटमध्ये तयार होतात. त्यातच टाटा कंपनीच्या हॅरियर आणि सफारी या दोन्ही वाहनांनी मार्केटमध्ये चांगले यश मिळवले आहे.
टाटा हॅरियर आणि सफारी या दोन्ही असेंबली लाईनवर सुमारे 1500 महिला कर्मचारी कार्यरत आहेत. असेंबली लाईनवर काम करण्यासाठी टाटा मोटर्स कडून प्रशिक्षण वर्ग देखील चालवले जातात. टाटा मोटर्स पदवीधर महिलांसाठी तांत्रिक अभ्यासक्रम चालवते. ज्यातून आजवर शेकडून मुलींनी आपले करिअर घडवले आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी टाटा मोटर्सला भेट देऊन महिला अभियंत्यांकडून त्यांचा कामाचा अनुभव आणि महिलांना कामात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. या भेटीतून आपण खूप प्रेरित झालो असल्याचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायककुमार चौबे हे आयआयटी कानपूर या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी तंत्रज्ञान आधारित असल्याने तांत्रिक बाबींवर आधारित पोलिसांचे बळकटीकरण करून पोलिसांचा कारभार हा टेक्नोसेव्ही करण्यावर त्यांचा भर असतो. पोलिसांच्या कामाचा वेळ वाचण्यासाठी तसेच सर्व कामे जलद गतीने होण्यासाठी आयुक्तांनी ‘ई ऑफिस’ ही संकल्पना सुरू केली. त्यासाठी बनवण्यात आलेल्या संकेतस्थळावर लॉगिन करून आपल्या नावावर किती कामे पडली आहेत, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मिळते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.