BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : कै.राम गणेश गडकरी करंडक मराठी एकांकिका स्पर्धेत पुण्याचे ‘आय अग्री’ प्रथम

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज -अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा, श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आयोजित कोहिनूर ग्रुप पुरस्कृत ‘२० वे कै. राम गणेश गडकरी करंडक मराठी एकांकिका स्पर्धा’ १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत आमचे आम्ही, पुणे यांची ‘आय अग्री’ एकांकिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला. या स्पर्धेत एकूण २५ संघांनी सहभाग नोंदविला होता. लातूर, इस्लामपूर, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, ऐरोली, मुंबई आदी राज्यभरातील विविध ठिकाणांहून संघ आले होते. बालनाट्य चळवळीचे अभ्यासक, नाट्यकर्मी आणि ‘नाटक घरात चाललंय जोरात’ द्वारे घराघरात नाटक सादर करणारे प्रा. देवदत्त पाठक यांचे हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला.

  • सुरुवातीस पुलवामा येथे शहीद झालेल्या सीआरपीएफच्या ४१ जवानांना आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी प्रास्ताविक केले. परीक्षकांतर्फे प्रातिनिधिक मनोगत व सुनीता पाटणकर, बेळगाव यांनी व्यक्त केले.

नाट्यकला ही जोडणारी, जागृती व प्रबोधनासाठी निर्माण झालेली कला आहे, तिचा उपयोग इंग्रजांच्या विरोधातही करण्यात आला होता. नाटक हे समूहाने करण्याचे असल्यामुळे समूहाने त्याचा अभ्यास करणे, सर्व प्रकारच्या नाटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचे रसग्रहण केले पाहिजे, इतरांचीही नाटके बघितली पाहिजेत, असे देवदत्त पाठक यांनी सांगितले. तसेच नाटक ही वागणे दुरुस्त करणारी कला आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील मुलांना, सामान्य वस्तीतील मुलांना शिकविल्यानंतर त्यांच्या वागणुकीत बदल अनुभवता आले, असेही त्यांनी सांगितले. नंतर शहिदांना स्मरण करुन कोणत्याही प्रकारे टाळ्या न वाजविता तसेच जल्लोष न करता पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला.

  • आमचे आम्ही, पुणे यांची ‘आय अग्री’ एकांकिका प्रथम, राजारामबापू इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉ. इस्लामपूर यांची ‘कस्तुरा’ही दुसरी तर सौंदर्य निर्मिती थिएटर, नासिक यांची ‘बट बिफोर लिव्ह’ ही तिसरी आली व तथास्तु थिएटर्स, कोल्हापूर यांच्या’विलग’ एकांकिकेस उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

स्पर्धेचे परिक्षण विवेक गरुड (नासिक), अरुण शेलार (मुंबई) व सुनिता पाटणकर (बेळगांव) यांनी केले. व सूत्रसंचालन किरण येवलेकर यांनी केले.
सुहास जोशी, नरेंद्र आमले, राजेंद्र बंग, गौरी लोंढे, संतोष शिंदे, संतोष रासने, रघू ढेमरे व जयराज काळे यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

HB_POST_END_FTR-A2

.