Chinchwad : अपक्ष उमेदवाराला विनाकारण धक्काबुक्की करत पैसे मागितल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – अपक्ष उमेदवाराला चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी विनाकारण धक्काबुक्की करून धमकी देत पैशांची मागणी केली. असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवार अजय लोंढे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यामध्ये खुळे यांनी लोंढे यांना जातीय शिवीगाळ केल्याचेही म्हटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

अजय लोंढे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अजय लोंढे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ते निवडणूक खर्च देण्यासाठी निगडी येथील हेडगेवार भवन येथे रिक्षातून जात होते. चिंचवड पोलीस ठाण्यासमोरून जात असताना पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी त्यांना अडवले. त्यानंतर रिक्षाचालकाला आणि अजय यांना शिवीगाळ केली. पोलीस ठाण्यात नेऊन दुपारी सव्वातीन ते रात्री नऊपर्यंत विनाकारण बसवून ठेवले. खुळे यांनी अजय यांच्याकडे 25 हजार रुपयांची मागणी केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. विश्वजित खुळे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा 4 नोव्हेंबर पासून लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे म्हणाले, “अजय लोंढे रिक्षातून प्रचार करत जात होते. त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले होते. चौकशी झाल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1