Chinchwad : चोरलेल्या कारला भंगारमधील कारचे इंजिन जोडून ‘ते’ कमवायचे रग्गड पैसे

कार चोरणा-या आंतरराज्य टोळीकडून 12 कार, 15 कार इंजिन जप्त

एमपीसी न्यूज – इन्शुरन्स कंपनीकडून भंगारमध्ये कार घ्यायच्या, त्याच मॉडेलच्या कार दुसऱ्या राज्यातून चोरून आणायच्या. चोरून आणलेल्या कारला भंगारमधील कारचे इंजिन नंबर आणि आरटीओ पासिंग नंबर बदलून त्याची विक्री करायची आणि रग्गड पैसा कमवायचा. असा टोळीचा उद्योग होता. अशा आंतरराज्यीय टोळीच्या एका सदस्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून 12 कार, 15 कारचे इंजिन असा 2 कोटी 19 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

चनप्रित हरविंदपाल सिंह (वय 43, रा. रावेत, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक या रोडवर एक गॅरेज आहे. त्या गॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात कारचे इंजिन आणि सुट्टे पार्ट आहेत. तसेच गॅरेजच्या बाहेर दोन कार पार्क केलेल्या असून त्या चोरीच्या असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील आणि पोलीस शिपाई सचिन मोरे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी संशयित गॅरेजवर दोन दिवस लक्ष ठेवले. दरम्यान, पोलिसांना गॅरेजमधील हालचालींवर संशय बळावल्याने गॅरेजचा मालक चनप्रित याला ताब्यात घेतले आणि गॅरेजची पाहणी केली.

गॅरेज समोर पार्क केलेल्या एका इनोव्हा कारवर महाराष्ट्राचा पासिंग नंबर होता आणि त्याच्या इंजिन नंबरची चौकशी केली असता ती कार पंजाब राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी दुस-या राज्यातून वाहने चोरून आणून त्याचे चेसिस आणि आरटीओ नंबर बदलून विकत असल्याचे उघड झाले. त्यानुसार, पोलिसांनी चनप्रित याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 13 दिवस पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस कोठडीत असताना आरोपीने सांगितले की, त्याचे एका साथीदारासोबत भागीदारीत रावेत येथे गॅरेज आहे. ते दोघेजण इन्शुरन्स कंपनीकडून अपघात झालेल्या कार त्याच्या कागदपत्रांसह विकत घेत. विकत घेतलेल्या कारच्या मॉडेल आणि रंगाची सेम टू सेम कार पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि इतर राज्यातून चोरून आणत. चोरून आणलेल्या गाड्यांवर अपघात झालेल्या खरेदी केलेल्या केलेल्या गाड्यांचे चेसिस आणि आरटीओ नंबर लावून ते मोठ्या रकमेला विकत. किमान 10 आणि कमाल 18 लाख रुपयांपर्यंत या बनावट कारची विक्री होत असे.

महागड्या कार जप्त

आरोपीने विक्री केलेल्या चार इनोव्हा, एक फॉर्च्युनर, एक मारुती स्विफ्ट, दोन ह्युंदाई वेरना, एक मारुती इर्टिगा, एक मारुती आल्टो, एक फोक्सवॅगन पोलो, एक मारुती रिट्स अशा 12 महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्या. आरोपीचे पुण्यातील कोंढवा येथे देखील गॅरेज होते. कोंढवा आणि रावेत येथील गॅरेजमधून इन्शुरन्स कंपनीकडून घेतलेल्या गाड्यांचे 13 आणि पंजाब, दिल्ली येथून चोरीला गेलेल्या गाड्यांचे दोन असे एकूण 15 इंजिन असा एकूण 2 कोटी 19 लाख रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या युनिट एकने जप्त केला आहे. आरोपीकडून आणखी कार मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी राज्यभरातून जमा केल्या आरोपींनी विकलेल्या कार

जप्त केलेल्या कार पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, नागपूर, सातारा, अहमदनगर, आळेफाटा आणि गोवा येथून जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या सहा कारच्या चोरीचे गुन्हे चंदिगढ (मटौर पोलीस ठाणे), पंजाब (डिव्हिजन नंबर दोन पोलीस ठाणे), पंजाब (डिव्हिजन नंबर सात पोलीस ठाणे), हरियाणा (चांदणीबाग पोलीस ठाणे), दिल्ली (कीर्तीनगर पोलीस ठाणे), पंजाब (डिव्हिजन नंबर सात) हे सहा गुन्हे उकडकीस आले आहेत. अन्य सहा वाहनांबाबत पोलीस तपास करीत आहेत.

चोरलेली कार आणण्यासाठी तो करायचा विमान प्रवास

आरोपी आणि त्याचा गॅरेज पार्टनर इन्शुरन्स कंपनीकडून भंगारमध्ये कार खरेदी करत असत. खरेदी केलेल्या कार सारखी कार परराज्यातील साथीदारांना चोरी करण्याची ऑर्डर दिली जात. ऑर्डर प्रमाणे परराज्यातील साथीदार कार चोरी करत. ठरलेल्या ठिकाणी कार चावीसह पार्क केली जायची. आरोपी पुण्यातून पंजाब, हरियाणा आणि दिल्ली येथे चक्क विमानाने जात होता. जाताना विमानाने जायचे आणि येताना चोरी केलेली कार चालवत घेऊन यायची, असा आरोपीचा कार्यक्रम ठरलेला. परराज्यातून आणलेली कार पुण्यातील साथीदाराकडे सुपूर्द करायची आणि पुन्हा दुसरी कार आणण्यासाठी निघायचे, असा या कार चोरट्या टोळीचा ठरलेला कार्यक्रम होता. आरोपी चनप्रित या पंजाब पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर वाहन चोरीचे 10 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, रवींद्र गावंडे, प्रमोद लांडे, बाळू कोकाटे, मनोजकुमार कमले, अमित गायकवाड, मारुती जायभाये, अंजनराव सोडगीर, महेंद्र तातळे, सचिन मोरे, सुनील चौधरी, प्रमोद हिरळकर, प्रमोद गर्जे, विजय मोरे, गमेश सावंत, तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like