Chinchwad crime News : महागड्या दुचाकी चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; साडेसात लाखांच्या 8 दुचाकी जप्त

0

एमपीसी न्यूज – कर्नाटक राज्यातून येऊन पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील साथीदारांना सोबत घेऊन महागड्या दुचाकी चोरणा-या टोळीतील तीन जणांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. ही टोळी पिंपरी चिंचवड शहरात चोरलेली वाहने विक्रीसाठी कर्नाटक राज्यात घेऊन जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटक केलेल्या तिघांकडून साडेसात लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अमरेश किसन चव्हाण (वय 19, रा. डुडुळगाव, मोशी, पुणे. मूळ रा. कर्नाटक), किरण नूरसिंग राठोड (वय 20, रा. वडगाव, ता. मावळ, जि. पुणे. मूळ रा. कर्नाटक), करण अर्जुन कु-हाडे (वय 19, रा. साई समर्थनगर, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

3 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या वेळी चिखली परिसरातील नेवाळेवस्ती येथून एकाच वेळी दोन बुलेट दुचाकी चोरीस गेल्या होत्या. त्याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांचे पथक करत होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.

आरोपींचा माग काढून आरोपी अमरेश चव्हाण याला मोशी येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने हिंजवडी येथून देखील दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्या गुन्ह्यात त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 18 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना आरोपी अमरेश याच्याकडे तपास करत पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांना तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेतले.

आरोपी त्यांच्या कर्नाटक येथील आणखी दोन साथीदारांसोबत मिळून पिंपरी चिंचवड शहरातून दुचाकी चोरी करत असल्याचे आरोपींनी तपासात सांगितले. पिंपरी चिंचवड शहरातून चोरलेल्या महागड्या दुचाकी हे चोरटे कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील देवदुर्गा या त्यांच्या गावी विक्रीसाठी घेऊन जात होते.

गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे यांनी कर्नाटक राज्यात चार दिवस थांबून आरोपींनी लपवून ठेवलेल्या 2 बुलेट, 3 एफ झेड, 2 पल्सर, 1 पॅशन अशा साडेसात लाखांच्या 8 दुचाकी हस्तगत केल्या.

या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील 2 (बुलेट), तळेगाव दाभाडे 2 (एफ झेड), हिंजवडी 2 (पल्सर, पॅशन), पिंपरी पोलीस ठाण्यातील एक (पल्सर) वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

अटक केलेल्या आरोपींचे आणखी दोन साथीदार कर्नाटक राज्यात राहतात. तिथून येऊन सर्वजण पिंपरी चिंचवड शहरात फिरून महागड्या दुचाकी चोरत असत. चोरलेल्या दुचाकी कर्नाटक राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असत. आरोपी करण हा तळेगाव येथील असल्याने त्याला पिंपरी चिंचवड शहराची संपूर्ण माहिती होती. त्यामुळे इतर आरोपी त्याला गाडी चोरी करण्यासाठी तसेच गाडी चालवण्यासाठी घेऊन जात असत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उप निरीक्षक काळुराम लांडगे, सहाय्यक पोलीस फौजदार रविंद्र राठोड, रविंद्र गांवडे, तसेच पोलीस कर्मचारी बाळु कोकाटे, अमित गायकवाड, महादेव जावळे, सोमनाथ बो-हाडे, सुनिल चौधरी, प्रमोद हिरळकार, सचिन मोरे, अंजनराव सोडगिर, प्रमोद गर्जे, आनंदा बनसोडे, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.