Chinchwad : गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तूल पुरविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; 42 पिस्तुल, 66 जिवंत काडतुसे जप्त

Interstate gang smuggling illegal pistols exposed; 42 country made pistols, 66 live cartridges and a car seized पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई : वेषांतर करीत दोन ठिकाणी तळ ठोकून आवळल्या आरोपींच्या मुसक्या

एमपीसी न्यूज – बेकायदेररित्या पिस्तुलांची तस्करी करून महाराष्ट्रातील गुन्हेगारी टोळ्यांना पिस्तुले पुरविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील 26 आरोपींच्या आंतरराज्य टोळीचा गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने छडा लावला असून, या आरोपींकडून तब्बल 42 पिस्तूल, 66 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलिसांनी मध्यप्रदेशात तळ ठोकून वेषांतर करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

मार्च महिन्यात गणेश माळी याला पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्यावर वाकड ठाण्यात गुन्हा दाखल होता.  यामध्ये चौकशी केली असता त्याने हे पिस्तूल बीड येथील ग्यानोबा उर्फ गोटू मारुती गीते याच्याकडून घेतल्याचे समोर आले.

त्यावेळी दोघांकडून सहा पिस्तूल व 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. यावेळी केलेल्या तपासात गोटू गीते याने मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील सरदार नावाच्या व्यक्तीकडून पिस्तूल आणल्याचे सांगितले होते.

त्यानुसार मार्च महिन्यात पथकाने मध्यप्रदेशमध्ये  आरोपीचा शोध घेतला मात्र, लॉकडाउनमुुळे तपासावर मर्यादा आल्या.

लॉकडाउन शिथिल होताच पिस्तूल पुरविणाऱ्या मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी ऍक्शन प्लॅन तयार केला. त्यानुसार धार जिल्ह्यातील मनावर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंघाना येथे पथक रवाना झाले.

त्याठिकाणी वेषांतर करीत दोन दिवस तळ ठोकून मनिसिंग गुरुमुखसिंग भाटिया याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 11 पिस्तूल, 22 जिवंत काडतुसे जप्त केली.

त्याच्याकडे केलेल्या तपासादरम्यान त्याचा साथीदार कालुसिंग जसवंत सिंग याने महाराष्ट्रातील कुश नंदकुमार पवार (रा. तळेगाव दाभाडे), प्रसन्न ज्ञानेश्वर पवार ( रा. गोडुंब्रे),  आकाश उर्फ बाळा जगन्नाथ वाघमोडे (रा. कुर्डुवाडी, जि. सोलापूर), योगेश विठ्ठल कांबळे (रा. परांडा, उस्मानाबाद), ग्यानोबा उर्फ गोटू मारुती गीते (रा.परळी, बीड) या टोळी प्रमुखांना पिस्तूल विकल्याचे समोर आले.

वेगवेगळी पथके तयार करून या आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये कुश पवार व प्रसन्न पवार या टोळी प्रमुखांनी माध्यप्रदेश येथून 29 पिस्तूल आणल्याचे निष्पन्न झाले असून, हे पिस्तूल पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारांना विकल्याचे समोर आले.

यामध्ये मोक्क्यातील आरोपींचा समावेश आहे. आकाश पडळघिरे (रा. रिहे, मुळशी), प्रकाश उर्फ पप्पू किसन मांडेकर (वय 27, रा. आंबेठाण), ओंकार उर्फ अभिजित बाजीराव ढमाले (वय 26, ढमाले चाळ, जुनी सांगवी (संतोष राठोड (तळेगाव दाभाडे), तुषार महादू बावकर (वय 25, कासारसाई, मुळशी), शिवकुमार उर्फ मुरगन बल्ली (रा देहूरोड), सिराज सलीम शेख (वय 35, रा. आंबेठाण) अशी आरोपींची नावे असून यापैकी कुश पवार, प्रसन्न पवार, सिराज शेख, प्रकाश मांडेकर यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 18 पिस्तूल व 22 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

तर आकाश वाघमोडे, योगेश कांबळे यांनी माध्यप्रदेशातून 27 पिस्तूल आणल्याचे निष्पन्न झाले. हे पिस्तूल त्यांनी अक्षय दिलीप केमकर (वय 28, रा. मेडद,  माळशिरस, सोलापूर),  योगेश उर्फ आबा बाबुराव तावरे (वय, 24, रा माळेगाव, बारामती), चेतन उर्फ मामा गोविंद लिमन (वय 28, रा. लिंबाची तालीम, हवेली), प्रज्ञेश संजय नेटके, (रा. भोर आळी, चिंचवडगाव), मयूर अनिल घोलप, विकी अनिल घोलप (दोघेही रा. बिबवेवाडी, पुणे), राजू भाळे (रा. इंदापूर,) सोमनाथ उर्फ सोमा रमेश चव्हाण (रा. कालगाव, ता. कराड)  यांना विकल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून 7 पिस्तूल व 7 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तर गोटू गीते याच्याकडून 6 पिस्तूल व 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, या कारवाईत एकूण 26 आरोपी निष्पन्न झाले असून, त्यातील 15 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 19 लाख 89 हजार 500 रुपये किमतीचे 42 पिस्तूल 66 काडतुसे, एक मोटार जप्त केली आहे.

ही कारवाई युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, हवालदार प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, आदिनाथ मिसाळ, नाईक संतोष आसवले, लक्ष्मण आढारी, तुषार शेटे, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, आजीनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.