Chinchwad : ‘कलारंग’चा वर्धापनदिनी पिंपरी-चिंचवडकारांसमोर उलगडले बहुरंगी ‘नाना’

एमपीसी न्यूज – कलारंग सांस्कृतिक कला संस्था पिंपरी-चिंचवड या संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत झाली. प्रसिद्ध मुलाखतकार व संवादक समीरन वाळवेकर यांनी नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली. मुलाखती दरम्यान पिंपरी-चिंचवडकरांना कलाकार नाना, सामाजिक कार्यकर्ता नाना, सहृदय नाना, कौटुंबिक बिकट परिस्थितीच्या छातीवर पाय ठेऊन स्वतःची वाट काढून आपली ओळख निर्माण केलेला नाना अशी नाना पाटेकर यांनी रूपे अनुभवता आली.

कार्यक्रमासाठी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे, डॉ. पी डी पाटील, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, भाजप सरचिटणीस उमा खापरे, अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे, उपमहापौर तुषार हिंगे, मधुकर बाबर, आझमभाई पानसरे आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र चुग, शारदा मुंढे, सोपानराव खुडे, नाट्य कलाकार अमृता ओंबाळे, चित्रकार सुनील शेगावकर, लेखक जालिंदर कांबळे यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ या संस्थेचा यावेळी सन्मान करण्यात आला.

नाना पाटेकर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी बिकट होती. त्या परिस्थितीत दबून न राहता त्यांनी त्यातून प्रेरणा घेतली. परिस्थितीच्या आठवणी त्यांनी त्यांच्या अभिनयात साकारल्या. त्यांच्या अभिनय विश्वात त्याचा मोठा वाटा आहे. जे आपण जगत असतो तसंच रक कलाकार म्हणून सादर करायला हवं, असे नाना म्हणाले. नाम या सामाजिक संस्थेचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तरुण पिढी या कामाकडे लक्ष देत आहे. सक्रियपणे त्यात सहभागी होत आहे. समाजाच्या विविध प्रश्नांवर लढण्यासाठी तरुणाई ‘नाम’च्या माध्यमातून तयार होत असल्याचे समाधान त्यांनी मुलाखती दरम्यान व्यक्त केले.

पी. डी. पाटील म्हणाले, “नाना पाटेकर यांचे सामाजिक वैभव मोठं आहे. सिनेनाट्य क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही त्यांचा लौकिक आहे. नानांनी दिलेल्या प्रेमापोटी त्यांना सर्व क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. कलारंग संस्थेची काम शहरात मोठे आहे.”

भाऊसाहेब भोईर म्हणाले, “काही व्यक्ती एवढ्या कर्तृत्ववान होतात की ते व्यक्ती न राहता तो विचार होतो. नाना पाटेकर हे नटसम्राट तर आहेतच पण समाजसम्राट सुद्धा आहेत. आमदार महेश लांडगे यांची भाजप शहराध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने अभिनंदन देखील भोईर यांनी केले.

अमित गोरखे यांनी प्रास्ताविक केले. कलारंग संस्था मागील 21 वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.