Chinchwad : ‘कारगिल हिरो’ दिगेंद्र कुमार यांच्या उपस्थितीने एमपीसी न्यूज वर्धापनदिनास देशप्रेमाची किनार

एमपीसी न्यूज- एमपीसी न्यूजचा 11 वा वर्धापन दिन काल, गुरुवारी मोठ्या थाटात साजरा झाला. वाचक आणि श्रोत्यांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून एमपीसी न्यूजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सर्वात प्रमुख आकर्षण ठरले ते कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानी सैन्यावर त्वेषाने आक्रमण करणारे, शत्रूंच्या गोळ्या छातीवर झेलणारे महावीरचक्र विजेते दिगेन्द्र कुमार सिंग यांची उपस्थिती. त्यांनी सांगितलेल्या कारगिल युद्धांच्या आठवणींनी कार्यक्रमाला देशप्रेमाची किनार लाभली. योगायोगाने कारगिल विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला एका वीर सुपुत्राचा सत्कार करण्याची संधी एमपीसी न्यूजला मिळाली.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दिगेन्द्र कुमार सिंग पिंपरी-चिंचवड शहरात आले असताना योगायोगाने एमपीसी न्यूजच्या वर्धापन दिनाला त्यांची उपस्थिती लाभली. दिगेन्द्र कुमार सिंग हे जयपूर येथे राहत असून हरिणामधील एका जाट कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील आणि आजोबा या दोघांनीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला होता.

कारगिल युद्धाच्या दरम्यान मेजर विवेक गुप्ता नेतृत्व करीत असलेल्या राजपुताना रायफल्सच्या सेकंड बटालियनला द्रास सेक्टरमधील 15 हजार फूट उंचीवर असलेली शत्रूंची 11 ठाणी जिंकण्याची मोहीम सोपवण्यात आली होती. या बटालियनमध्ये दिगेन्द्र कुमार सिंग होते. त्यांच्यावर पहिले आणि शेवटचे ठाणे जिकंण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

13 जून 1999 रोजी आपल्या टार्गेटच्या जवळ आलेले असतानाच शत्रूंनी या बटालियनवर गोळीबार सुरु केला. या गोळीबारात मेजर विवेक गुप्ता यांच्यासहित चार जवान शहीद झाले. दिगेन्द्र कुमार सिंग हे देखील गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरामध्ये 18 गोळ्या शिरल्या. त्या अवस्थेमध्ये देखील त्यांनी आपल्या हातामधील लाइट मशिनगनमधून गोळीबार सुरु ठेवला आणि 48 पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले.

त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दिगेन्द्र कुमार याना श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी देशाचे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी बाजपेयी यांनी दिगेन्द्र कुमार यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांचे कौतुक केले. ही आठवण देखील दिगेन्द्र कुमार मोठ्या अभिमानाने सांगतात. पुढे पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या दिगेन्द्र कुमार यांच्यावर उपचार सुरु असतानाच मृत्यूने त्यांच्या भोवतीचा फास आवळायला सुरुवात केली होती. आता ते शहीद होणार असे वाटत असतानाच अचानक शरीरातील रक्तपुरवठा पूर्ववत सुरु झाला आणि ते मृत्यूच्या कराल दाढेतून सहीसलामत बाहेर आले. ‘पुण्याच्या मातीने मला असा काही लेप लावला की मला पुन्हा जीवनदान मिळाले’ असे सांगतानाच पुण्याबद्दल त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली.

या शौर्याबद्दल त्यांना 15 ऑगस्ट 1999 रोजी दुसऱ्या सर्वोच्च महावीरचक्र सन्मानाने गौरविण्यात आले. अशा या वीरपुत्राचा सन्मान करण्याची संधी एमपीसी न्यूजला लाभली. मृत्यूवरही मात करणाऱ्या या महावीरास कोटी-कोटी प्रणाम !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.