Chinchwad : पैशाच्या हव्यासापोटी केले होते 12 वर्षाच्या माहीचे अपहरण

एमपीसी न्यूज – चिंचवड स्टेशन परिसरातून गुरुवारी (दि.15) भरदिवसा माहीचे अपहरण करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी बारा तासात अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन माहीची सुखरूप सुटका केली. अपहरणकर्त्यांनी झटपट पैसे कमावण्यासाठी 12 वर्षाच्या माहीचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

माही अवध जैन (वय 12) असे सुखरूप सुटका झालेल्या मुलीचे नाव आहे. नितीन सत्यवान गजरमल (वय 25, रा. नेरे. मूळ रा. देवगाव, ता. परंडा, जि. उस्मानाबाद ), जितेंद्र पप्पूराम बंजारा (वय 21, रा. थेरगाव, वाकड) अशी याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माही चिंचवड मधील क्विन्स टाऊन सोसायटीमध्ये राहते. त्यांचा परिवार मूळ जयपूर मधील आहे. ते आधी निगडी येथे राहायचे. मागील तीन वर्षांपूर्वी जैन परिवार चिंचवड मधील क्विन्स टाऊन सोसायटीत राहायला आले. तिचे वडील आयटी क्षेत्रात तर आई बँकेत काम करतात. माही नेहमीप्रमाणे दुपारी चार वाजता शाळेतून घरी आली. शाळेच्या स्कूलबस मधून सोसायटीच्या गेटवर उतरली. त्यानंतर पेन आणण्यासाठी ती सोसायटी जवळ असलेल्या माय मार्ट या दुकानात गेली. पेन घेऊन परत येत असताना तिथेच दुकानासमोर कारमध्ये दबा धरून बसलेल्या आरोपींनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. माहीने आरडाओरडा केला. हा आरडाओरडा पाहून दुकानदार बाहेर आला. तोपर्यंत कार सुसाट गेली.

दुकानदाराने मोपेड दुचाकीवरून कारचा पाठलाग केला. परंतु थोडे अंतर गेल्यानंतर कार गायब झाली. दुकानदाराने याबाबत माहीच्या घरी आणि एका सामाजिक कार्यकर्त्याला कळवले. सामाजिक कार्यकर्त्याने थेट पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांना फोनवर घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आयुक्तांनी स्वतः सूत्रे हातात घेतली आणि अधिकऱ्यांना सूचना केल्या. आयुक्तांच्या आदेशानुसार अवघ्या काही मिनिटातच स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेची पथके, इतर पोलीस ठाण्याची पथके तपासासाठी रवाना झाली. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. मुख्य चौकातील सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना एका मेडिकल स्टोअर्सच्या कॅमे-यामध्ये अपहरणकर्त्यांची कार कैद झाली.

संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस प्रशासन माहीच्या शोधासाठी अलर्ट झाले. शहर आणि परिसरातील लॉज हॉटेल्स चेक करण्यासाठी काही पथके गेली. काही पथके टोल नाक्यांवर तर एक पथक तांत्रिक तपास करू लागले. रात्री आठच्या सुमारास माहीच्या वडिलांच्या मोबाईलवर अपहरण कर्त्यांनी पैशांच्या मागणीसाठी फोन केला. आरोपींनी माहीच्या वडिलांकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. यावरून पोलिसांना अपहरणकर्त्यांचा सुगावा लागला. पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेत मुलीला ज्या ठिकाणी ठेवले होते ते ठिकाण शोधून काढले.

आरोपींनी झटपट पैसे कमावण्यासाठी हा मार्ग निवडला. आरोपी गेल्या काही महिन्यांपासून गुन्ह्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी नुकतीच 40 हजारांची जुनी कार घेतली होती. माही हे त्यांचे टार्गेट नव्हते. मात्र एखाद्या उच्चभ्रू सोसायटीतील मुलगी पळवून नेल्यास चांगले पैसे मिळतील असा त्यांचा समज होता. त्यासाठी क्विन्स सोसायटीबाहेर त्यांनी गेल्या आठ दिवसापासून सापळा रचला होता. सुरवातीला आरोपींनी माहीच्या घरच्यांकडे 50 लाख इतकी खंडणी मागितली. मात्र इतके पैसे देणे शक्य नसल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितल्यानंतर शेवटी 15 लाख देण्याच्या बोलीवर त्यांनी मुलीला सोडण्याचे मान्य केले होते.

आरोपीने राहत्या घरात मुलीला कोंडून ठेवले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे दीडच्या सुमारास नेरे गावातून त्या मुलीची सुखरूप सुटका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.