Chinchwad : आयुक्तांनी विद्यार्थ्यांना दिली स्वच्छतेची व पर्यावरण संवर्धनाची शपथ

एमपीसी न्यूज- क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या 150 वे जयंती वर्ष तसेच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त “स्वच्छता अभियान व प्लास्टिकमुक्त भारत जनजागृती वार्षिक अभियानाचे “
उदघाटन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची व पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली.

क्रांतिवीर चापेकर समूहशिल्प चापेकर चौक, चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमाला क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष शकुंतला बन्सल, कार्यवाह अॅड. सतीश गोरडे, सहकार्यवाह रवींद्र नामदे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, शाला समिती अध्यक्ष अशोक पारखी, गतिराम भोईर, सदस्य आसाराम कसबे, समितीच्या सर्व शाळा व पुनरुत्थान समरसता गुरुकुलम मधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वच्छता व पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी उपस्थितांना प्लास्टीकचा वापर टाळा, कापडी पिशव्या वापरा, ओला व सुका कचरा वेगळा करा अशा आचरणाची शपथ दिली. त्याचप्रमाणे आयुक्त श्रावण हर्डीकर व समितीच्या पदाधिकार्‍यांनी स्वतः हातात झाडू घेऊन परिसर साफ करुन स्वच्छता अभियानाचे उद्घाटन केले.

समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी आपल्या प्रास्ताविकात महात्मा गांधीजी व क्रांतिवीर चापेकर यांच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने समितीतर्फे वर्षभर राबवण्यात येणार्‍या स्वच्छता अभियान व प्लास्टिकमुक्त भारत जनजागृती अभियानाची रुपरेषा स्पष्ट केली.

यावेळी आसाराम कसबे यांनी या विषयावर आधारित स्वरचित भारुड सादर केले. तसेच सर्व शाळा व गुरुकुलम मधील विद्यार्थ्यांनी सुद्धा भारुड सादर केले. खिंवसरा पाटील शिक्षण संकुल मधील शिक्षकेतर कर्मचारी पोळ व सहकारी शिक्षकांनी गीताद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला. पर्यावरण संवर्धनाच्या जनजागृती फेरी या निमित्ताने काढण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक जगताप, जगन्नाथ देवीकर, पूनम गुजर, वांसती तिकोणे, हुले मॅडम, शुभदा साठे, अतुल आडे आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.