Chinchwad : कोरोनाच्या संकटात पोलीस आयुक्तालयाला मनुष्यबळाची कमतरता; पोलिसांची विशेष पथके बरखास्त

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मनुष्यबळ अपुरे पडत आहे. ‘कोरोना’ बंदोबस्तासाठी पोलीस कमी पडत असल्याने विशेष पथके बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी नुकतेच याबाबतचे आदेश दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण 15 पोलीस स्टेशन आहेत. आयुक्तालयात सुमारे तीन हजारांचे मनुष्यबळ सध्या उपलब्ध आहे. 500 चौरस किलोमीटरच्या हद्दीत पसरलेल्या सुमारे 40 लाख लोकसंख्येच्या शहराला हे मनुष्यबळ अतिशय तोकडे आहे. त्यात रात्र आणि दिवस पाळी, साप्ताहिक सुट्या, किरकोळ रजा, आजारपण, कार्यलयीन कामकाज करणारे, विविध पथकांमधील पोलीस वगळता प्रत्यक्ष काम करण्यासाठी कमी पोलीस उरतात.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील काही नागरिक विनाकारण रस्त्यावर येतात. तर, काही व्यापारी मागच्या दाराने दुकाने उघडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शहरातील प्रत्येक चौकात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर या सर्व बाबींचे नियोजन करताना वरिष्ठांची चांगलीच दमछाक होत आहे.

मागील आठवड्यात पोलीस आयुक्तांनी जाणीवपूर्वक गैरहजर राहणाऱ्या पोलिसांचे निलंबन केले होते. त्याची शहर पोलिसात चांगलीच चर्चा झाली. काही महिन्यांपूर्वी शहरातील एटीएम फोडीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली होती. यामध्ये दहा कर्मचारी व तीन अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

तसेच, वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी सात कर्मचारी व दोन अधिकाऱ्यांचे ‘वाहन चोरी विरोधी पथक’ स्थापन करण्यात आले होते. या पथकांमध्ये पोलीस ठाण्यातील निवडक कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले होते. मागील काळात पथकांतील पोलिसांनी काही किचकट गुन्ह्यांचा छडा देखील लावला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर असलेले सर्व कर्मचारी नियुक्तीच्या मूळ ठिकाणी हजर होण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व विशेष पथके बरखास्त करण्यात आली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.