Chinchwad : ‘स्वरसायलीच्या ‘स्वरांगण रसिक योजनेचा गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर शुभारंभ

एमपीसी न्यूज – ‘उंच उभारू गुढी अंबरी; करूया स्वर रसपान, स्वागत व्हावे नववर्षाचे; गाऊनी मंगलगान’ या काव्यपंक्तीला अनुसरून रसिकांना सांगितिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील आणि प्रयोगशील असलेल्या ‘स्वरसायली’या चिंचवडस्थित संस्थेच्या वतीने पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील रसिकांसाठी ‘स्वरांगण रसिक योजना’पाडव्याच्या शुभमुहुर्तावर सुरू करण्यात येत असल्याची घोषणा ‘सारेगमप’फेम गायिका-अभिनेत्री सायली राजहंस-सांभारे यांनी पत्रकार परिषदेत केली. या नाविन्यपूर्ण उपक्रमास मातृमंदिर विश्वस्त संस्था आणि नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे संपूर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

‘स्वरांगण रसिक योजने’ ची माहिती देण्यासाठी चिंचवड येथील अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी- चिंचवड ऑफिस रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आवार चिंचवड येथे शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम मनोहर वाढोकार सभागृह येथे रविवार, दि. ७ एप्रिलला सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होणार आहे. शारदा ज्ञानपिठाचे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ, शास्त्रीय गायक पं. राजेंद्र कंदलगावकर, मसापच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष, कवी राजन लाखे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत. त्यांच्यासह मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे प्रमुख विश्वस्त यशवंत लिमये, नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे प्रमुख कार्यवाह सुहास जोशी आदी उपस्थित होते.

  • सायली राजहंस-सांभारे यावेळी बोलताना म्हणाल्या, ‘‘सूर, ताल, शब्द यांचा त्रिवेणी संगम असलेली ‘स्वरांगण रसिक योजना’आहे. संगीताच्या माध्यमातून चांगले विचार समाजापर्यंत, रसिकांपर्यंत पोहचविणे या उद्देशाने नवीन वर्षानिमित्त ही योजना हाती घेतली आहे. सभासदत्व स्विकारलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल. सभासदांसाठी वर्षातून ६ सांगितिक कार्यक्रम आयोजित केले जातील. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9158399158.’’

‘स्वरांगण रसिक योजने’चे पहिले पुष्प ‘वेचू शब्दरत्ने’या संत जनाबाई, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, शांता शेळके तसेच त्यांच्या समकालिन कवयत्रींच्या रचना आणि सुप्रसिद्ध गाणी याद्वारे गुंफले जाणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन ‘स्वराज्य रक्षक संभाजी’या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते शंतनू मोघे करणार आहेत. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’या मालिकेतील राजकुंवर भोसले-शिर्के ही भूमिका साकारणार्‍या सुप्रसिद्ध गायिका-अभिनेत्री सायली राजहंस-सांभारे, ‘सारेगमप’फेम सुप्रसिद्ध गायक चैतन्य कुलकर्णी यांचा सहभाग असून कार्यक्रमाची संकल्पना, संहिता लेखन स्वरसायली यांचे आहे. संगीत संयोजन अनय गाडगीळ यांचे असून, दिग्दर्शक मकरंद कुलकर्णी आहेत.

  • ‘वेचू शब्दरत्ने’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शक या नात्याने मकरंद कुलकर्णी म्हणाले, ‘‘संत जनाबाई, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, शांता शेळके या स्वयंभू कवयत्री असून त्यांनी एक परंपरा निर्माण केली आहे. या सर्व कवयित्रींच्या कार्याचा गौरव व्हावा या समविचारानी एकत्र आलेल्या कलाकार-वादकांनी मिळून ह्या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. या कवयत्रींची निवड केली त्यामागचे कारण म्हणजे त्यांच्यामागे कुठलीही साहित्य पूर्वपिठीका नाही तरीही त्यांनी त्यांच्या काव्यातून प्रबोधन केले आहे. त्यांच्या शब्दरत्नांतूनच त्यांची महती आपल्याला कळते.’’

यशवंत लिमये म्हणाले, ‘‘दर्जेदार संगीत रसिकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी संस्थात्मक पातळीवर या योजनेला आधार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांना संगीत या विषयाची गोडी लागावी म्हणून संस्थेच्या संगीत विद्यालयामार्फत अनेक वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने ‘स्वरांगण रसिक योजने’च्या माध्यमातून कार्य होणार असल्याने संस्थेने या उपक्रमाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.’’

  • यावेळी सुहास जोशी म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडची ओळख औद्योगिकनगरी अशी आहे. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्ये सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. परिषदेचे अध्यक्ष यासाठी सर्व संस्थांना सहकार्य करीत असतात. व्यावसायिक क्षेत्रातही पिंपरी-चिंचवड परिसरातील कलावंत नाव कमावत आहेत. सायली राजहंस-सांभारे पिंपरी-चिंचवडमधील सांस्कृतिक चळवळीतून पुढे आल्या आहेत. ‘स्वरांगण रसिक योजना’ हा उपक्रम सुंदर आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून रसिकांना दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा, यासाठी परिषदेचा सक्रिय सहभाग असणार आहे.’’

कार्यक्रमाविषयी सन टुरिझम इंटरनॅशनल प्रा. लि.च्या संचालिका निशिता घाटगे म्हणाल्या, ”समाजबांधिलकीतून हा कार्यक्रम होत असल्याने या उपक्रमात सहभागी झालो आहोत. संगीतातून मिळालेला आनंद पैशात मोजता येत नाही, हे खरेच आहे. ज्या भूमीत राहिलो, वाढलो त्यासाठी या माध्यमातून वेगळे काही करण्याची संधी मिळत आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.