Chinchwad: लक्ष्मण जगताप अन् राहुल कलाटे यांच्यात होणार दुरंगी लढत; महायुतीत बंडखोरी

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचे लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यात सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी कलाटे यांना पुरुस्कृत करण्याची दाट शक्यता आहे. जगताप आणि कलाटे यांच्यात होणा-या दुरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत तीघांनी माघार घेतली. मात्र, कलाटे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे आता जगताप आणि कलाटे यांच्यात लढत होणार आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुका सर्वपक्षांनी स्वतंत्र लढविल्या होत्या. त्यामध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्यात लढत झाली होती. मोदी लाटेत देखील कलाटे यांनी दुस-या क्रमांकाची म्हणजेजच 63 हजार 489 मते घेत ‘टफ फाईट’ दिली होती. यावेळी शिवसेना-भाजपची महायुती आहे. पण, राहुल कलाटे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पुन्हा जगताप आणि कलाटे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.

जगताप यांची ही तिसरी निवडणूक आहे. 2009 मध्ये जगताप सर्वांची मोठ बांधून अपक्ष निवडून आले होते. तर, 2014 मध्ये भाजपकडून ते निवडून आले आहेत. यावेळी त्यांच्यासमोर पुन्हा कलाटे यांचे तगडे आव्हान असणार आहे. भाजपचे नाराज नगरसेवक देखील कलाटे यांना मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार मैदानात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कलाटे यांना मदत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांची मोठ बांधून कलाटे अपक्ष निवडून येतात की जगताप हॅटट्रट्रिक करतात हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘हे’ आहेत निवडणुकीच्या मैदानात!
भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप, अपक्ष राहुल कलाटे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे, जनहित लोकशाही पार्टीचे नितीश लोखंडे, बहुजन मुक्ती पार्टीचे एकनाथ जगताप, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश घोडके, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर संचेती, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती चंद्रकांत देसले यांच्यासह सुरज खंडारे, डॉ. मिलिंदराजे भोसले, राजेंद्र काटे, रवींद्र पारधे हे निवडणुकीच्या मैदानत आहेत.

यांनी घेतली माघार :
कैलास परदेशी, जावेद शेख, धर्मपाल तंतरपाळे यांनी माघार घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.