Chinchwad: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चाकण खून प्रकरणातील पीडित कुटुंबाला भेट

Chinchwad: Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar visits Chakan murder victim's family ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. सामान्य नागरिकांना इथे निर्भीडपणे जगता आलं पाहिजे.

एमपीसी न्यूज – चाकण येथे एका 17 वर्षीय मुलीचा खून करून तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत टाकल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर दरेकर यांनी पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

चाकण येथे एका गावाजवळ कॅनॉलच्या भरावावर नेऊन एका सतरा वर्षीय तरुणीचा डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर मुलीचा मृतदेह एका झाडाखाली काटेरी झुडुपात टाकून दिला. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पीडित कुटुंबियांची रविवारी (दि.26) सकाळी भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करत आरोपींना कठोर शासन करण्याचे आश्वासन त्यांनी कुटुंबीयांना दिले.

त्यानंतर दरेकर यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांचीही भेट घेतली. प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती घेऊन त्यांनी आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, “ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. सामान्य नागरिकांना इथे निर्भीडपणे जगता आलं पाहिजे. पीडित मुलीला न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे.”

अपर आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, “पोलीस तपास सुरू आहे. आरोपींची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही. आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.