Chinchwad : कामावर जाऊ द्या, नाहीतर आमच्या मूलभूत गरजांची सोय तरी करा; आनंदनगरमधील नागरिक पुन्हा रस्त्यावर; पोलिसांवर दगडफेक

एमपीसी न्यूज – सगळं शहर सुरु करत आहात तर आम्हाला पण जाऊ द्या. काम करू द्या. आमचं हातावर पोट आहे. असं म्हणत चिंचवड येथील आनंदनगर मधील नागरिक आज, (सोमवारी, दि. ८) दुपारी पुन्हा रस्त्यावर आले. दरम्यान, पोलिसांकडून बळाचा वापर केला गेल्याने नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली.

त्यामुळे या भागातील नागरिकांना शहरातील इतर भागात जाता येणार नाही. तसेच शहरातील इतर भागातील नागरिकांना आनंदनगर परिसरात येता येणार नाही. हा परिसरात झोपडपट्टीचा असून इथल्या सर्व लोकांचे हातावरचे पोट आहे.

शहरातील उद्योग, व्यापार, वाहतूक अशा सर्व बाबी सुरु होत आहेत. त्यामुळे आम्हाला  बाहेर कामासाठी जाऊ द्या. सध्या आमची आर्थिक चणचण असल्यामुळे हाल होत आहेत. जर आम्हाला बाहेर जाऊ द्यायचे नसेल तर किमान मूलभूत गरजांची पूर्तता करा, अशी मागणी करत नागरिक रस्त्यावर आले.

मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर आल्याने घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी जमाव शांत करण्यासाठी बळाचा वापर केला. एक-दोघांना पोलिसांच्या काठीचा प्रसाद मिळाल्याने जमाव आणखी पेटला.

जमावाने महिलांना पुढे करून पोलिसांवर दगडफेक केली. तसेच परिसरात लावलेल्या तीन वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी लावलेल्या बॅरीगेट आणि पत्रेही   नागरिकांनी काढले.

आनंदनगर परिसरात मोठ्या प्रमाणत पोलीस बंदोबस्त तौनात करण्यात आला असून येथील परीसरात तणावपूर्ण शांतता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.