Chinchwad: ‘महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी’चा महाअंतिम सोहळा 28 डिसेंबरला चिंचवड येथे रंगणार

एमपीसी न्यूज – खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला क्रीडा मंच पुणे यांच्या वतीने ‘महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी’ या मराठमोळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा 28 डिसेंबर (शनिवारी) दुपारी साडेचार वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे रंगणार आहे. महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या पाचही विभागातून स्पर्धक निवडण्यात आले आहेत.

महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञीच्या महा अंतिम सोहळ्यासाठी अभिनेत्री स्नेहल तरडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. मराठी बोलींचा विकास व्हावा, त्यातून मराठी भाषेला समृद्ध करावे, हा उद्देश या स्पर्धेच्या आयोजनामागे ठेवण्यात आला आहे. राज्यातील एकमेव अस्सल मराठमोळी सौंदर्य स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा नावलौकिक राज्यभर पसरला आहे.

महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यातून महा अंतिम स्पर्धेसाठी स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून केवळ एक स्पर्धक निवडण्यात आला आहे. त्याचबरोबर उपस्थित प्रेक्षकांमधून लकी ड्रॉ द्वारे देखील तीन स्पर्धक निवडण्यात येतील. निवडलेल्या प्रेक्षक स्पर्धकांना बाळासाहेब कापसे यांच्याकडून कापसे पैठणी देण्यात येणार आहे. महा अंतिम सोहळ्यासाठी प्रवेश निशुल्क आहे.

महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेचे आयोजन विजया मानमोडे यांनी केले आहे. महिलांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे. तसेच मराठी भाषेचा जागर यानिमित्ताने व्हावा, मराठी भाषेची ज्योत अखंड प्रज्वलित राहावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेमध्ये राज्यभरातून इंजिनियर, डॉक्टर, नोकरदार, व्यवसायिक, गृहिणी अशा विविध क्षेत्रातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या कला गुणांचे सादरीकरण केले आहे, असे आयोजिका मानमोडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.