Chinchwad : माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेचा माथाडी मंडळावर मोर्चा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेने माथाडी मंडळाच्या चिंचवड येथील कार्यालयावर सोमवारी (दि. 16) मोर्चा काढला. माथाडी कामगारांनी घोषणा देत त्यांच्या मागण्यांचे निवेदन माथाडी मंडळाला दिले. कामगारांच्या मागण्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणी यावेळी माथाडी कामगारांनी केली.

महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चासाठी कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष किसन बावकर, खंडू गवळी, सर्जेराव कचरे, बाळासाहे शिंदे, भिवाजी वाटेकर, ज्ञानोबा मुजुमले, प्रवीण जाधव, मुरलीधर कदम, पांडुरंग कदम, सतीश कंठाले, गोरक्ष डुबाले, सुनील सावले, राजेन्द्र तापकिर, अशोक साळुंके, श्रीकांत मोरे, बाबासाहेब पोते, चिमाजी वाळुंज, सोपान तुपे, बबन काळे, समर्थ नाईकवडे, लक्ष्मण सापते, एकनाथ तुपे, शंकर मदने, ज्ञानेश्वर पाचपुते, उद्धव सरोदे, सोपान घाडगे, राजेश आवटे, आबा मांढरे आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने यावेळी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, ‘पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळातील बहुतांश कामगार महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सभासद आहेत. माथाडी मंडळात काम करताना या कामगारांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून माथाडी मंडळावर मंडळ सदस्याची नेमणूक न झाल्यामुळे कामगारांचे अनेक प्रश्न मंडळाकडे पडून आहेत.

माथाडी मंडळातील नोंदणीकृत कामगारांना काम करताना किरकोळ अपघात झाल्यास त्याच्या औषधोपचारासाठी लागणारा खर्च देण्यासाठी मंडळाकडून दुर्लक्ष केले जाते. शासनाच्या अद्यादेशाचे मंडळाकडून पिंपरी-चिंचवड शहरात प्रबोधन केले जात नाही. नोंदणीकृत आस्थापनांमध्ये वीर संघटनेच्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून त्रास झाल्यास त्यावर मंडळाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. कामगारांनी राजीनामा दिल्यानंतर कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीचा धनादेश वेळेवर दिला जात नाही. यामुळे कामगारांची आर्थिक कुचंबना होते.

_MPC_DIR_MPU_II

औद्योगिक नगरीत अनेक संघटना माथाडी कायद्याचे पालन करण्याबाबत पत्रव्यवहार करतात मात्र, मंडळाकडून त्यावर देखील कार्यवाही केली जात नाही. आस्थापना नोंदणी करण्यासाठी संबंधित मालकांनी पत्रव्यवहार केल्यास त्याच्या नोंदी देखील केल्या जात नाहीत. मंडळाकडून कामगारांचे वेतन वेळेवर होत नाही. अशा अनेक प्रश्नांच्या गर्तेत माथाडी कामगार अडकला आहे.

पिंपरी-चिंचवड व असंरक्षित कामगार मंडळामध्ये पुरेसे अधिकारी व कर्मचारी नाहीत. काही अधिका-यांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी शासन कोणतीही पावले उचलत नाही. मागील अनेक वर्षांपासून माथाडी मंडळासाठी पूर्णवेळ अध्यक्ष आणि सचिव यांची नेमणूक झालेली नाही. याचा दैनंदिन व्यवहार व कामकाजावर परिणाम होत आहे. या जागा तात्काळ भरल्या जाव्यात.

सध्या पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळाचे कार्यालय अस्वच्छ जागेत आहे. या कार्यालयात चोरी होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चांगल्या जागेत प्रशस्त कार्यालय असायला हवे. माथाडी कामगारांना भविष्य निर्वाह निधी, उपादान नुकसान भरवावी आदी सुविधा सुरळीतपणे मिळाव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.