Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील ‘मॅन ऑफ चेकलिस्ट’ सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – आपल्या काटेकोर नियमांमुळे पोलीस दलात ‘मॅन ऑफ चेकलिस्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेले पिंपरी-चिंचवडचे सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल आज, मंगळवारी (31 डिसेंबर 2019) सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 30) पोलीस आयुक्त कार्यालयात घेण्यात आला.

निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई होते. यावेळी सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल सहकुटूंब उपस्थित होते. तसेच उपायुक्त सुधीर हिरेमठ, विनायक ढाकणे, स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक उपस्थित होते. प्रकाश मुत्याल यांचा पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहपोलीस आयुक्त प्रशासन पदावर भारतीय पोलीस सेवेतील प्रकाश प्रभाकरराव मुत्याल यांची 11 सप्टेंबर 2019 रोजी नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे आदेश पोलीस महासंचालकांनी काढले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सध्या अस्तित्वात असलेले अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) हे पद अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) या पदामध्ये 31 डिसेंबर 2019 पर्यंत रूपांतरित करण्यात आले आणि 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुख्य दक्षता अधिकारी महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, मुंबई हे पद पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वर्ग करण्यात आले. खास पद तयार करून मुत्याल यांना पिंपरी-चिंचवड येथे नियुक्ती देण्यात आली.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, “सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल यांच्यासोबत काम करण्याचा प्रवास मुंबई येथे सुरु झाला. मागील अनेक वर्षांचा प्रवास आजवर राहिला आहे. प्रत्येक वेळी त्यांची शिस्त काहीतरी शिकवून जायची. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहण्याची त्यांची सवय हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा पैलू आहे. कामाला प्राथमिकता देऊन त्यांनी पोलीस दलामध्ये सेवा केली आहे.”

उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल यांच्या सोबत काम करताना आलेले अनुभव सांगत त्यांची स्वभाववैशिष्ट्ये सांगितली. पुण्यात झालेल्या सोशल मीडियावरील दंगलीची आठवण करून देत त्यातून प्रकाश मुत्याल यांनी अत्यंत संयमाने एका रात्रीत मार्ग काढल्याचे देखील हिरेमठ यांनी नमूद केले. ‘सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल यांनी प्रत्येक कामाची चेकलिस्ट तयार केलेली असायची. शिस्तप्रिय अधिकारी आणि सुसंस्कृत पोलीस स्टेशन तयार कारण्यात सध्या सेवानिवृत्त होणा-या पोलीस अधिका-यांचा मोठा सहभाग आहे. त्यांची काम करण्याची पद्धत पोलीस दलासाठी प्रेरणादायी आहे, असे उपायुक्त विनायक ढाकणे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले.

सत्काराला उत्तर देताना सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल म्हणाले, “आजवर माझी पोलीस दलात 37 वर्ष सेवा झाली आहे. या कालावधीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, सर्व ठिकाणी काम सारखेच आहे. आपल्याकडे परिस्थितीला हाताळण्याची कला असायला हवी. कारण त्यावर आपल्या कामाचे यश अवलंबून आहे. कामासाठी चालढकल करणारे अनेक अधिकारी, कर्मचारी आजही खात्यात आहेत. दिलेली कर्तव्ये व्यवस्थित पार पाडली आणि प्रामाणिकपणे काम केल्यास कधीच अडचण येत नाही. वस्तुस्थिती लक्षात घेऊन काम करा, तुम्ही इन्व्हॉल्व झालात तर परिस्थिती कायम नियंत्रणात राहते.

पोलीस दलात अजूनही चेकलिस्टचा वापर केला जात नाही, असे म्हणत मुत्याल यांनी नाराजी व्यक्त केली. मुत्याल पोलिसांच्या चेकलिस्टवर आधारित एक पुस्तक लिहीत असून त्याचे येत्या महिनाभरात प्रकाशन होणार आहे. त्यानंतर, ते पोलिसांना पुस्तकाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपायुक्त विनायक ढाकणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like