Chinchwad : मंगलमूर्तींची द्वारयात्रा गुरुवारपासून

एमपीसी न्यूज – चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित श्री मंगलमूर्तीच्या द्वारयात्रेला उद्या गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. चार ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल, असे देवस्थानतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु. प्रतिपदा ते चतुर्थी असे चार दिवस महासाधू मोरया गोसावी यांची द्वारयात्रा काढली जाते. या चार दिवसात मोरया गोसावी देवस्थानाच्या चार द्वाराला असणा-या देवींच्या स्थानाला तसेच श्री भैरोबाच्या स्थानाला द्वारयात्रा काढली जाते.

द्वारयात्रच्या काळात रोज सकाळी नऊ वाजता यात्रेसाठी श्री मंगलमूर्ती वाड्यातून देवस्थानचे विश्वस्त देव महाराज यांच्या समवेत वाजत गाजत सुमारे 100 ते 150 भाविकांचा समुदाय निघतो. श्री मोरया गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेस प्रारंभ केला जातो. द्वाराच्या ठिकाणी पोहोचल्यावर द्वारदेवतेचे पूजन, गोंधळ, जोगवा असे धार्मिक विधी केले जातात. परत येताना मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात यात्रेचा समारोप होतो.

यात्रेचा पहिला दिवस (गुरुवार)पूर्वद्वार अर्थात पिंपरीतील श्री मांजराई देवीच्या मंदिरात जाणार आहे. श्री मंगलमूर्ती वाडा ते मोरया गोसावी समाधी मंदिर, गांधी पेठ, तानाजीनगर, लिंक रोड, भाटनगर, पिंपरी कॅम्पमार्गे मांजराई देवीच्या मंदिरात यात्रा जाईल, आणि याच मार्गे परतेल.

दुस-या दिवशी (शुक्रवार )दक्षिणद्वार म्हणजे वाकड येथील श्री आसराई देवीच्या मंदिरात मंगलमूर्ती वाडा, मोरया गोसावी समाधी मंदिर, गांधी पेठ, केशवनगर, काळेवाडी फाटा ते वाकड या मार्गे जाईल.

तिस-या दिवशी (शनिवार)पश्चिमद्वारच्या रावेत येथील ओझराई देवी मंदिरात जाईल. मंगलमूर्ती वाडा, मोरया गोसावी समाधी मंदिर, गोखले आळी, चापेकर चौक, पवनानगर, बिजलीनगर, प्राधिकरण, रावेतमार्गे यात्रा जाईल. शेवटचा दिवस रविवार (दि. 4) उत्तरद्वार म्हणजेच आकुर्डीतील श्री मुक्ताई देवी मंदिरात जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.