Chinchwad : मंगलमूर्तींच्या द्वारयात्रेला भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ

एमपीसी न्यूज- चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित श्री मंगलमूर्तीच्या द्वारयात्रेला आज, गुरुवारी सकाळी भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. चार ऑगस्टला यात्रेचा समारोप होणार आहे.

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु. प्रतिपदा ते चतुर्थी असे चार दिवस महासाधू मोरया गोसावी यांची द्वारयात्रा काढली जाते. या चार दिवसात मोरया गोसावी देवस्थानाच्या चार द्वाराला असणा-या देवींच्या स्थानाला तसेच श्री भैरोबाच्या स्थानाला द्वारयात्रा काढली जाते.

आज सकाळी नऊ वाजता यात्रेसाठी श्री मंगलमूर्ती वाड्यातून देवस्थानचे विश्वस्त देव महाराज यांच्या समवेत वाजत गाजत सुमारे 100 ते 150 भाविक द्वारयात्रेसाठी निघाले. श्री मोरया गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या द्वारयात्रेने आज पूर्वद्वार अर्थात पिंपरीतील श्री मांजराई देवीच्या मंदिराच्या दिशेने प्रस्थान ठेवले. द्वाराच्या ठिकाणी पोहोचल्यावर द्वारदेवतेचे पूजन, गोंधळ, जोगवा असे धार्मिक विधी केले जाणार आहेत.

उद्या ही द्वारयात्रा दक्षिणद्वार म्हणजे वाकड येथील श्री आसराई देवीच्या मंदिरात जाणार आहे. तर तिस-या दिवशी (शनिवारी) पश्चिमद्वारच्या रावेत येथील ओझराई देवी मंदिरात आणि शेवटचा दिवशी रविवार (दि. 4) उत्तरद्वार म्हणजेच आकुर्डीतील श्री मुक्ताई देवी मंदिरात द्वारयात्रा जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.