BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पीएमपीएमएल नाट्य सेवा संघाचं ‘बॅलन्स शीट’

225
PST-BNR-FTR-ALL

(विराज सवाई)

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या दहाव्या दिवशी पी.एम.पी.एम.एल. नाट्य सेवा संघाचं ‘बॅलन्स शीट’ हे विद्यासागर अध्यापक लिखित नाटक सादर झालं. याचं दिग्दर्शन दिलीप आंग्रे यांनी केलं होतं.

सेल्स टॅक्स ऑफीसर या पदावर असलेल्या अनंत वसईकर यांना बेस्ट सिटीझन पुरस्कार मिळाल्याबद्दल दुस-या दिवशी त्यांच्या घरी पार्टीची तयारी सुरू असते. परंतु ऑफिस मधून घरी येताच अनंत, त्यांच्या नुकत्याच अकरावीत गेलेल्या मुलाला, उज्वलला पोलिसांनी अटक केल्याची बातमी बायकोला सांगतात. उज्वल त्याच्या मोबाईल मध्ये एका मित्राच्या सहाय्याने आक्षेपार्ह क्लिप्स चित्रित करून समाज माध्यमांवर टाकत असल्याच्या संशयावरून पोलिस पाळत ठेऊन त्याला रंगेहाथ पकडतात.

यामध्ये उज्वल एकटाच सापडतो. पोलिसांनी फोनवर ही इत्यंभूत माहिती सांगितल्यावर अनंत वसईकर बिथरतात. काय करावं हे त्यांना सुचेनासं होतं. ते मित्रांना फोन करून पार्टी कॅन्सल करतात. एवढं सगळं घडून सुद्धा उज्वलला वाचवण्यासाठी आपला नवरा स्वत:ची प्रतिष्ठा सोडायला तयार नाही हे बघताच बायको त्यांच्यावर भडकते आणि दोघेही एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडू लागतात. यामधे काही फ्लॅशबॅक सीन्स दाखवले असून त्यात उज्वलच्या बाबतीत पालकांच्या झालेल्या चुका, जे आपल्याला करता आलं नाही ते उज्वलला करता यावं यासाठी सगळ्या गोष्टींत त्यांनी त्याला दिलेली मोकळीक. कम्प्युटर वर तो काय करतो आहे हे वेळीच बघण्याकडे केलेलं दुर्लक्ष. अशा प्रसंगांची पेरणी करून तपशील दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

मग डोक्यावरचा ताण हलका करण्यासाठी अनंत दारू घेतात. मग अचानक अनंतना त्यांच्या सुधन्वा या वकील मित्राची आठवण होते. फोनवर घडला प्रकार ते वकीलमित्राला सांगतात. त्यानंतर वकीलाच्या आधीच इन्पेक्टर सावंत आणि हवालदार लोकरे घराची झडती घेण्यासाठी वसईकरांच्या घरी हजर होतात. तिथे घरातल्या कम्प्युटरवर उज्वलविरूद्ध सबळ पुरावा ठरू शकतील अशा काही हिडन फाईल्स त्यांना सापडतात. तेवढ्यात वकील तिथे येतात आणि समझोता करून प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना अमीष दाखवतात. त्याउलट इन्स्पे. सावंत कायद्यानं कम्प्युटर अनंत वसईकरांचा असल्यामुळे त्यांच्याविरूद्ध अटकेचं फर्मान काढतात.

वसईकर स्वतःची इभ्रत जपण्यासाठी प्रतिवाद करून बचावाचा पवित्रा घेतात. शेवटी वकिलांच्या प्रयत्नांनी इन्स्पेक्टर सेटलमेंट करायला तयार होतो आणि एक भयानक प्रस्ताव सगळ्यांसमोर ठेवतो. तो मान्य केला तर या कानाचं त्या कानालाही कळू न देता सगळेच यातून सलामत राहू शकत असतात. आणि तो प्रस्ताव अनंत वसईकर जबरदस्त किंमत मोजून मान्य करतात. तो प्रस्ताव नाटकाचा क्लायमॅक्स आहे म्हणून तो इथे लिहू शकत नाही हे वेगळं सांगायला नकोच.

हेमांगी काळे(बायको- तारा), दिलीप आंग्रे(अनंत), प्रतीक भिसे(उज्वल), विनोद जंबुकर (इन्स्पे. सावंत), नितीन पगारे(हवालदार लोकरे), किशोर ढमाले(वकील सुधन्वा) या सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका चांगल्या केल्या आहेत. दिग्दर्शनात सुधारणेला जागा आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा आदि ठीक होती. प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद या नाटकाला मिळाला.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3