Chinchwad : शिक्षकांनी गुणवत्तापूर्वक, दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – उद्याचे पिंपरी-चिंचवड शहराचे भवितव्य घडविणे ज्या मुलांच्या हातात आहे. त्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण दिल्यास ते या शहराचा विकासाचा एक भाग होऊ शकतात. महापालिकेच्या माध्यमातून जर शिक्षणासाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला असेल. तर, शिक्षकांनी विद्यार्थांना गुणवत्तापूर्वक, दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार,आयुक्त श्रावण हर्डीकर, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या माधवी राजापुरे, शर्मिला बाबर, विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे, नगरसदस्य विलास मडीगेरी, शत्रुघ्न काटे, राजेंद्र गावडे, तुषार हिंगे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, पराग मुंढे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांच्यासह मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.

लक्ष्मण जगताप म्हणाले, ”जगाला आर्दश घालून देणारे शिक्षकच असतात, परंतु शिक्षणामध्ये समृध्दी व गुणवत्ता वाढीसाठी आपणा सर्वांकडून आत्मपरिक्षण झाले पाहिजे. सर्व सामान्य कुटुंबातील मुले ज्या प्रमाणे महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात, त्याचप्रमाणे उच्च सोसायटीतील मुलांनी देखील महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. शिक्षकांनी आपल्या कामाला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे, सन्मान मिळवून दिला पाहिजे व समाजात विश्वास मिळवून दिला. तरच, त्याचे समाजाकडून अनुकरण केले जाईल”.

महापालिकेच्या शाळांची पटसंख्या घटणे ही दुर्दैवी बाब आहे. आपणच आपल्या शाळांची गुणवत्ता कमी समजतो. महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्ता असून देखील त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपण कमी पडतो. भविष्यात अशा गुणवत्तेचा प्रचार प्रसार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

एकनाथ पवार म्हणाले, ”प्रत्येक विद्यार्थाला असे वाटले पाहिजे की, ही माझी आदर्शवत शाळा आहे. आणि हे मला ज्ञानदान देणारे शिक्षक आहेत. शिक्षकांनी पगार मिळतो म्हणून शिकवतो अशी संकुचित भावना न बाळगता शिक्षकांनी विद्यार्थांना गुणवत्तापूर्वक शिक्षण दिले पाहिजे, यासाठी आपल्या अडीअडचणी असल्यास तर त्या महानगरपालिकेला कळवाव्यात त्यावर योग्य तो निर्णय त्वरित घेतला जाईल”

श्रावण हर्डीकर म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागात समृध्दी घडवायची असेल. तर, चित्त डोळ्यांसमोर ठेऊन काम केले पाहिजे. यामध्ये शिक्षकांची एकाग्रता महत्वाची आहे. शिक्षणातील काही तत्व पाळली पाहिजेत. उचित ध्येय गाठण्यासाठी तत्वे काय असावी ती समजून घेतली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात आदर्शवत कार्य केलेल्या व्य़क्तींच्या आदर्शाचे अनुपालन केले पाहिजे. तरच ख-या अर्थाने आपण शिक्षण क्षेत्र समृध्द केल्याचा आनंद आपणास मिळेल. शिक्षक समृध्द उपक्रम यशस्वी करण्यासाठी तत्व पाळली पाहिजेत”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.