Chinchwad: आमदार जगताप यांनी पोलिसांना दिले संपूर्ण चेहरा झाकणारे 700 विशेष मास्क

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या लढाईत धोका पत्करून काम करणा-या पोलिसांना आमदार लक्ष्मण जगताप यांनी संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या विशेष मास्कची मदत दिली आहे. सुमारे 700 विशेष मास्क पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे सुपूर्त करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश गेल्या 21 दिवसांपासून लॉकडाऊन सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत संचारबंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून एकमेकाच्या संपर्कात येऊ नये आणि त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये हा त्यामागचा उद्देश आहे. संचारबंदीची प्रभावी अंमलबजवाणी करण्याची पूर्ण जबाबदारी पोलिसांची आहे. पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस रस्त्यावर काम करत आहेत.

हे जोखमीचे काम करत असताना काही पोलीस बांधवांनाही कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. आज अनेक पोलीस कर्मचारी मास्क अभावी तोंडाला रुमाल अथवा फडके तोंडाला बांधून कर्तव्य बजावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलिसांनी योग्य आणि चांगल्या दर्जाची सुरक्षा साधणे मिळणे गरजेचे आहे.

आमदार जगताप यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना पूर्ण चेहरा झाकणाऱ्या विशेष मास्कची मदत केली आहे. मंगळवारी पोलिस आयुक्तालयात सुमारे 700 विशेष मास्क सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी अमित पसरणीकर, गिरीश जाचक, धनंजय ढोरे, रोहित रसाळ, अमित पवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.