Chinchwad: विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ मनसेच्या महिलांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत आणि अपु-या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ मनसेच्या महिला पदाधिका-यांनी आज (शुक्रवारी) चिंचवड येथील पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले. ‘जनतेला पाणी मिळालेच पाहिजे’, ‘अधिका-यांचे करायचे काय खाली डोके वर पाय’ अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.

महिला शहराध्यक्षा अश्विनी बांगर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात उपाध्यक्षा अनिता पांचाळ, स्नेहल बांगर, संगीता देशमुख, सुजाता काटे, सुनीता गायकावड, श्रद्धा देशमुख, काजल गायकवाड, सीमा परदेशी, भाग्यश्री चिंचोळे, अनिता नाईक, सुप्रिया गायकवाड आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

अश्विनी बांगर म्हणाल्या, ” पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही भाजप आणि आयुक्त शहरवासीयांना वेठीस धरत आहेत. टँकर माफीयांसाठीच महापालिकेने 25 नोव्हेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याने पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. शहराच्या अनेक भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. संपुर्ण शहरात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. पाणी येण्याची वेळ निश्चित नाही. त्यामुळे महिलांचे हाल होत आहेत.

याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चिंचवडगावातील पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले. पोलिसांनी आम्हाला ओढून टाकीवरुन खाली आणले. बळजबरीने बसवून पोलीस ठाण्यात आणले आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.