Chinchwad : मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात अपंग रक्तदात्याने मारली बाजी; शिबिरात 185 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. अपंग रक्तदात्याने या शिबिरात बाजी मारत प्रथम रक्तदान केले. या शिबिरात 185 जणांनी रक्तदान केले. शिबिरात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. शिबिराचे यंदा 23 वे वर्ष होते.

अ‍ॅड.सुनील आवारे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेवक राजू गावडे, सुरेश भोईर, सतीश शिंदे, उमेश इनामदार, राजेश ढावरे आदी उपस्थित होते.

458 व्या श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला शनिवारपासून देऊळमळा पटांगणावर सुरुवात झाली आहे. या महोत्सवानिमित्त रविवारी (दि. 15) सकाळी साडे नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात आले. ओम ब्लड बँकेने रक्त संकलनाचे काम केले. गणेश तेली हे प्रथम रक्तदाता ठरले. गणेश जन्मतः अपंग आहेत. ते सकाळी वाकड येथून रिक्षातून आले आणि रक्तदान केले.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये तसेच गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने वर्षांतून किमान एकदा तरी रक्तदान करायला हवे, असे रक्तदान शिबिराचे संयोजक राजू शिवतरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.