Chinchwad: मोरया गोसावी मंदिर ते थेरगाव बोट क्लब परिसराचे होणार सुशोभिकरण

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदीरापासून थेरगाव बोट क्लबपर्यंतचा सुमारे दीड किलोमीटर परिसर आता चकाचक होणार आहे. पिंपरी महापालिकेतर्फे या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या आठ कोटी रूपये खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली.

चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर आणि मंगलमूर्ती वाडा या स्थळांना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. हजारोंच्या संख्येने भाविक दररोज मोरया गोसावी समाधी मंदिरात दर्शनासाठी येतात. हिंदुस्थानी स्वातंत्र्य लढ्यात चिंचवड येथील दामोदर, बाळकृष्ण आणि वासूदेव या एकाच चापेकर कुटूंबातील तीन भावंडांनी बलिदान दिले. हाच देशाभिमान, चापेकर बंधूंचे कार्य नव्या पिढीसमोर यावे, त्यांचा स्फुर्तीदायी इतिहास चिरंतन राहावा, यासाठी चिंचवडगावात शिल्पसमूह उभारण्यात आले आहे.

क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मृती योग्यरितीने जतन व्हाव्यात, उद्याच्या पिढीला त्यांच्या कार्याचे महत्व समजावे, यासाठी हे शिल्पसमूह महत्वपूर्ण ठरत आहे. थेरगाव बोट क्लब येथे केजूबाई बंधारा हा निसर्गरम्य परिसर आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.

पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे आता चिंचवड येथील मंगलमुर्ती वाडा, चापेकर शिल्पसमुह, मोरया गोसावी मंदीरापासून थेरगाव बोट क्लबपर्यंतच्या सुमारे दीड किलोमीटर परिसराचे सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी 9 कोटी 31 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या.

तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी एच. सी. कटारीया या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 15 टक्के कमी दर सादर केला. सन 2018-19 च्या एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा स्वीकृत योग्य दरापेक्षा 15.20 टक्क्याने कमी येत आहे.

त्यानुसार 7 कोटी 71 लाख रूपये अधिक 18 लाख 64 हजार रूपये रॉयल्टी चार्जेस आणि 5 लाख रूपये मटेरियल टेस्टींग शुल्क असे एकूण 7 कोटी 95 लाख रूपये या सुशोभिकरणासाठी खर्च होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 15 जून रोजी निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार, या विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.