Chinchwad : खून, दरोड्याच्या गुन्ह्यातील ‘मोस्ट वॉन्टेड’ गुंड खंडणी दरोडा विरोधी पथकाच्या जाळ्यात

'Most Wanted' hooligan in murder, robbery case caught by anti-robbery squad : मावळ तालुक्यातील पाचाणे ग्रामपंचायत परिसरात ही कारवाई करण्यात आली. 

एमपीसी न्यूज – खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील ‘मोस्ट वॉन्टेड’ गुंडाला  पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. मावळ तालुक्यातील पाचाणे ग्रामपंचायत परिसरात ही कारवाई करण्यात आली. 

अमर नानासाहेब चव्हाण (वय 20, रा. इंदिरानगर, पंचशिल हॉटेलच्या मागे, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस नाईक आशिष बोटके यांना बुधवारी (दि. 29) माहिती मिळाली की, चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी अमर चव्हाण पाचाणे ग्रामपंचायत समोर थांबलेला आहे.

त्यानुसार पोलिसांनी मावळ तालुक्यातील पाचाणे ग्रामपंचायत परिसरात रात्री  सापळा लावला. रात्री अकराच्या सुमारास अमर याला शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चिंचवड परिसरात खुनाचा गुन्हा केल्याचे सांगितले. पोलिसांनी अमर याला अटक करून पुढील कारवाईसाठी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आरोपी अमर चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यात मागील काही महिन्यांपासून फरार होता.

आरोपी अमर हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर डिसेंबर 2017 मध्ये एमपीडीए कायदयान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात एक आणि चिंचवड पोलीस ठाण्यात नऊ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उप निरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अजय भोसले, अशोक दुधवणे, महेश खांडे, उमेश पुलगम, किरण काटकर, नितीन लोखंडे, आशिष बोटके यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.