Chinchwad : खासदार शरद पवार हे राजकारणातले चाणक्यही आणि चंद्रगुप्तही -नाना पाटेकर

एमपीसी न्यूज – खासदार शरद पवार हे राजकारणातले चाणक्यही आहेत आणि चंद्रगुप्त देखील आहेत. ते आता राजकारण करत नसून कार्यकर्ते तयार करीत आहेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी नाना पाटेकर म्हणाले, “खासदार शरद पवार माझे हिरो आहेत. त्यांना मी एकदा खाजगीत बोलताना ‘तुम्ही राजकारणातले चाणक्य आहात. पण दुर्दैव हे की गेल्या 50 वर्षात एकही चंद्रगुप्त तयार नाही केलात’ असं म्हणालो होतो. पण नंतर लक्षात आलं की राजकारणातले चंद्रगुप्त ही तेच आणि चाणक्य ही तेच आहेत. मोठ्या असाध्य रोगाला त्यांनी परत लावलं तर माणसं काय चीज आहे. अजित पवार यांच्याशी माझे कधीकधी मतभेद असतात, पण ते माणूस म्हणून चांगले आहेत. मी एकदा एखाद्याला आपलं म्हटलं की म्हटलं. जे होईल ते होईल, त्याचा विचार मी करीत नाही.

  • माझे सगळ्या पक्षात मित्र आहेत. नाम फाऊंडेशनसाठी लागणारे प्रमाणपत्र अमित शहा यांनी एका दिवसात मिळवून दिलं. आपण आपलं काम किती चांगल्या प्रकारे करतो हे महत्वाचं असतं. कोणत्याही पक्षाची साधन सुचिता काढली तरी चांगलीच आहे. त्याची अंमलबजावणी आणि पायमल्ली कोण कशी करतं त्यावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे तो या पक्षाचा, तो त्या पक्षाचा हा भेद निवडणुकीपुरताच असायला हवा, असेही नाना म्हणाले.

राजकारण्यांना कधी कधी कटू निर्णय घ्यावे लागतात. राजकारण्यांनी शेतकऱ्यांना पैसे नाही दिले तरी चालतील. पण किमान मायेचा हात शेतकऱ्यांच्या खांद्यावर ठेवावा. भाजी घेताना शेतकऱ्यांशी घासाघीस करून त्यांचा भाव करू नये. कांद्याचा भाव वाढला तर अनेकांनी वेळापत्रक बिघडल्याच्या भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांचं आयुष्य बिघडलंय, त्याकडे कोणी लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मूलभूत गोष्टी द्या. त्यांना बाकी काही नको. शेतीसाठी अनुभवी शास्त्रज्ञ हवेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नियोजन करता येईल आणि त्यांचं उत्पन्न वाढेल. ‘नाम’च्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या आहेत. त्यांच्यात नवी आशा निर्माण झाली आहे.

  • अभिनय क्षेत्राविषयी बोलताना नाना म्हणाले, “स्मिता पाटील यांच्यामुळे मी सिनेमा क्षेत्रात आलो. नाटक करत असताना मंचावर प्रकाश आणि प्रेक्षकांत अंधार असतो, त्या अंधारात मांचावरील कलाकार आपला अंधार शोधत असतो. कॅमेऱ्याला भावना नसतात. कॅमेरा टाळी वाजवत नाही, दाद देत नाही. त्यामुळे समोर प्रेक्षक असावा असं वाटतं. प्रेक्षकांची दाद ही आणखी चांगला अभिनय करण्याची ऊर्जा देते.

सुरुवातीपासून बलात्कार करण्याचा रोल मी नाकारला. कारण ती मानसिकता माझी तयारच होणार नाही. त्यामुळे पहिला चित्रपट सुद्धा नाकारला. अत्याचाराच्या भूमिका आवडत नाहीत. भूक आणि अपमान या दोन गोष्टी जीवन जगायला शिकवतात. भूक आणि अपमान कोणत्याच विद्यापीठात शिकवता येत नाहीत. त्या दोन गोष्टी जीवनात शिकता येतात.

  • वजूद हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात चांगला चित्रपट आहे. पण दुर्दैव असे की हा चित्रपट फारसा चालला नाही. ‘पुरुष’ या नाटकाचे 17 वर्षात 1 हजार 860 प्रयोग केले. त्यात खलनायकाची भूमिका केली होती. ती आजही आठवते. आज चिंचवडच्या मंचावर नाटक असतं तर मजा आली असती. परत येईन कदाचित, असे म्हणत नाट्य क्षेत्रात पदार्पण करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. बॅरिस्टर नाटक करण्यासोबत बॅरिस्टर जगायला आवडेल, असेही ते म्हणाले.

अभिनय क्षेत्रात खूप चांगली माणसं आहेत – नाना
एकाच नाटकात अशोक सराफ आणि मी काम करत होतो. नाटकात काम करत असताना मला प्रत्येक प्रयोगाला 50 रुपये मिळायचे आणि अशोक सराफ यांना 250 रुपये मिळायचे. मला कमी पैसे मिळतात हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे अशोक सराफ माझ्यासोबत रमी खेळायचे आणि खेळात मुद्दाम दरवेळी 10-15 रुपये हरायचे. मला पैशांची गरज असल्याने मी सुद्धा ते पैसे घ्यायचो. तसंच कधी कधी अशोक सराफ यांची मालिश करायचो मग ते मला पाच रुपये द्यायचे. आजही त्यांची मालिश केल्यानंतर ते मला 10 रुपये काढून देतात आणि मी ते घेतो. महागाई वाढल्याने पाच रुपयांचे दहा झाले. असं म्हणतात सभागृहात हशा पिकला.

मकरंद अनासपुरे यांच्या बाबतीत देखील असाच प्रसंग आहे. त्यांचा अभिनय खूप चांगला आहे. त्यांच्या कल्पनेतून नाम सारखी संस्था उभी राहिली आहे. राज्यभर तिचे काम सुरू आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात अनेक माणसं खूप चांगली आहेत. काही लोकांमुळे क्षेत्र बदनाम होतंय.

  • पिंपरी चिंचवडच्या आठवणीत रमले ‘नाना’
    सुरुवातीच्या काळात माधव लिमये यांच्याकडे मी मुकादम म्हणून काम करत होतो. त्यावेळी लिमये यांनी फकिरभाई पानसरे यांच्या घराचे काम केले आहे. बांधकामावर मुकादम म्हणून पिंपरी चिंचवड शहरात काम करत असताना मी दर आठवड्याला कामगारांचा पगार वाटायचो. तेंव्हापासून पिंपरी चिंचवड शहराशी नाळ जोडली आहे. पानसरे यांच्या घराचे छत ठोकल्याचे अजून आठवते.

दरम्यान, आझमभाई पानसरे कार्यक्रमाच्या सभागृहात आले. त्यानंतर नानांनी पानसरे यांना ‘आझमभाई आता कुठं, आता कोणता पक्ष’ असे म्हटले. त्यावर पानसरे यांनी ‘आता राष्ट्रवादी पक्ष’ असे म्हटले. यावरून सभागृहात पुन्हा हशा पिकला. अनेक कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. ते लक्षात राहत नाही, त्यामुळे विचारावे लागते, असे स्पष्टीकरण देखील नानांनी दिले.

  • ‘भाजपने मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून घ्यायला हवं’ – नाना
    निवडणुकीच्या अगोदर वैचारिक कटुता आणि विरोध असू द्या. पण निवडणूक झाल्यानंतर जनतेसाठी एकत्र यायला हवं. भाजप सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून घ्यायला हवे. मनमोहन सिंग हे खूप चांगले माणूस आहेत. चांगले अर्थतज्ञ आहेत. जनतेच्या हितासाठी असा प्रयोग सरकारने करायला हवा, असेही नाना म्हणाले.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like