Chinchwad: दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका प्रयत्नशील -लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोणतीही दिव्यांग व्यक्ती शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील. जेणेकरून त्यांच्यामध्ये असहाय्यतेची भावना निर्माण होणार नाही, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत आज (मंगळवारी) प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप, समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, शहरातील दिव्यांग व्यक्तींना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. महापौर उषा ढोरे म्हणाल्या, महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांना वर्षाला दिली जाणारी आर्थिक मदत दर महिन्याला कशी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिव्यांग व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यामध्ये रामचंद्र तांबे, लता दुराफे, ऋतिका इंदलकर, शरद फलके, ज्ञानेश्वर गायकवाड, अशोक भोपळे, बाळू घुगे, श्रद्धा काटे, संपत पानसरे, आनंद बनसोडे, रमेश शिंदे आदींचा समावेश होता.

यावेळी प्रा. संतोष कार्ले यांचे दिव्यांग व्यक्तींसाठी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानही झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी केले. तर, सूत्रसंचालन प्रभारी माहिती व जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like