Chinchwad Murder News : वाल्हेकरवाडी खून प्रकरणी गुन्हा दाखल

मयत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी येथे ज्वारीच्या शेतात अज्ञातांनी एका तरुणाचा गळा चिरून निर्घृणपणे खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 11) रात्री घडली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मयत तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मयत तरुणाबाबत माहिती असल्यास चिंचवड पोलिसांशी संपर्क साधण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.

विशाल ज्ञानेश्वर चिंचवडे (वय 41, रा. वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी रोडवर रानमळा हॉटेलच्या मागील बाजूला फिर्यादी चिंचवडे यांचे शेत आहे. त्यांच्या ज्वारीच्या शेतात गुरुवारी सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजताच्या सुमारास अज्ञातांनी एका तरुणाचा गळा चिरून खून केला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला.

खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. मयत तरुणाचे वय अंदाजे 20 ते 22 वर्ष आहे. अंगाने सडपातळ, रंगाने गोरा, उंची 5 फुट 4 इंच, चेहरा उभट, नाक बसके, डोळे बारीक, केस काळे व पुढे ब्राऊन व लाल केलेले, अंगावर काळया रंगाचा शर्ट निळया रंगाची जिन्स पॅन्ट, पांढ-या रंगाचा बनियन, पायात चॉकलेटी रंगाची सॅन्डेल असे मयत तरुणाचे वर्णन आहे.

मयत तरुणाच्या बाबतीत काही माहिती असल्यास चिंचवड पोलिसांशी (020 27356768) संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.