Chinchwad New : सुशिक्षित विधिसंघर्षित बालकांसाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण शिबीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सुशिक्षित विधीसंघर्षित बालकांना तेरे देस होम्स, जर्मनी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मनोवैज्ञानिक चाचणी व समुपदेशनाव्दारे कल तपासून विविध व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण निवड शिबिर मुख्य वाहतूक कार्यालय, चाफेकर चौक, चिंचवड येथे झाले.

या उपक्रमांतर्गत सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे नकळत गुन्हेगारी मार्गावर गेलेल्या विधीसंघर्षित बालकांना मानसोपचार तज्ञांकडून मनोवैज्ञानिक चाचणीद्वारे समुपदेशन व मार्गदर्शन करून कौशल्य विकासाची संधी उपलब्ध करून त्यांना रोजगार अथवा स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याबाबत एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामुळे ही बालके भविष्यात पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता वस्तीपातळीवरील इतर मुलांसाठी आदर्श तयार करतील.

पहिल्या टप्प्यात निगडी, पिंपरी, भोसरी, आळंदी, वाकड व तळेगाव दाभाडे या पोलीस ठाण्यातील सुशिक्षित विधीसंघर्षित बालकांशी तेरे देस होम्स, जर्मनी या सामाजिक संस्थेच्या प्रकल्पातील व्यवसायिक समुपदेशकांनी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या क्षमता, आवड व कौशल्य जाणून घेवून प्राप्त माहितीच्या आधारे या मुलांसाठी मोफत व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.

16 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीत हे शिबीर झाले. पहिल्या टप्यातील 35 सुशिक्षित (किमान 10वी उत्तीर्ण) विधीसंघर्षित बालकांपैकी 19 विधीसंघर्षित बालकांची मनौवेज्ञानिक चाचणी पूर्ण झाली. उपक्रमांतर्गत निवड करण्यात आलेल्या सर्व बालकांच्या चाचण्या पूर्ण झाल्यावर त्यांना कोहीनूर इन्स्टिट्यूट, चिंचवड येथे व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षण कालावधी दरम्यान मुलांना प्रवास भत्ता व प्रोत्साहनपर भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या बालकांसाठी रोजगार मेळावा आयोजित करुन विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हा उपक्रम पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विशेष बाल पथकाचे पोलीस अंमलदार संपत निकम, दिपाली शिर्के, कपिलेश इगवे, अमोल मुठे, भुषण लोहरे यांनी आयोजित केला होता तर तेरे देस होम्स, जर्मनी या संस्थेचे व्यवस्थापक संपत मांडवे, मंदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे समुपदेशक नेहा जोशी, पर्णिका कोकाटे, गजानन कोरडे, दिप्ती जोशी यांनी समुपदेशन व मार्गदर्शन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.